घटना समितीचे कार्य चालू असताना राष्ट्रीय निशाण निर्माण करण्याचा प्रयत्न उपस्थित झाला. हे निशाण कोणत्या प्रकारचे असावे, याबद्दल अनेक पुढाऱ्यांनी, संस्थांनी आणि लेखकांनी आपापली मते प्रदर्शित केली. मुंबईतील काही संस्था, कार्यकर्ते आणि पुढारी यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना विनंती केली की, भारताला जे राष्ट्रीय निशाण हवे, ते भगव्या झेंड्याचे असावे; याचा घटना समितीत तुम्ही पुरस्कार करा. बाबासाहेबांनी या बाबतीत महाराष्ट्रात तुम्ही चळवळ करून मला पाठिंबा द्यावा, असे सांगितले. ते त्यांनी मान्य केले. या भरवशावर बाबासाहेबांनी भगवा झेंडा हाच राष्ट्रध्वज स्वीकारावा अशी घटनासमितीत खटपट केली.पण आयत्या वेळी सदर मंडळींनी त्यांना दगा दिला, त्यामुळे बाबासाहेबांना यश आले नाही. राष्ट्रीय झेंडा म्हणून तिरंगी झेंडा मान्य करण्यात आला. भगव्या झेंड्याचे प्रयत्न कसे व का फिसकटले, याबद्दल प्रबोधनकार श्री.ठाकरे यांनी २०-८-४७च्या 'नवशक्ती'त (जनमनाचा कानोसा) पत्र प्रसिद्ध केले. ते मी येथे देत आहे.
दिल्लीत भगव्या झेंड्याची खटपट का फिसकटली?
संपादक, नवशक्ती यांस, ता. १० जुलैला सांताक्रुझच्या विमानतळावर डॉ. आंबेडकर यांना स्थानिक हिंदू महासभेच्या अनंतराव गद्रे, रावबहादूर बोले प्रभृती पुढारी मंडळींनी आणि मराठा मंदिराचे गावडे, भिलारे वगैरे मंडळींनी हारतुरे घालून दोन भगवे झेंडे दिले आणि मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या झेंडा समितीत भगव्या झेंड्याची राष्ट्र ध्वज म्हणून निवड करण्याची खटपट करावी, असा आदेश दिला. ही बातमी सगळ्या पत्रांत आलेली होती. मराठा मंदिर आणि हिंदू महासभा अशा प्रातिनिधिक संस्थांनी केलेली ही खटपट पुढे का फिसकटली? या प्रश्नाचा अजूनपर्यंत कोणीही उलगडा केलेला नाही. म्हणून चौकशी करता जबाबदार गृहस्थांकडून मिळालेली माहिती मुद्दाम प्रसिध्दीला पाठवत आहे.
हा छ. शिवाजी महाराजांचा झेंडा नव्हे
हिंदू महासभावाल्यांकडे पाहावे तर ते त्यांचा सावरकरनिर्मित कृपाण-कुंडलिनी- स्वस्तिक चिन्हांकित भगवा झेंडा, कॉग्रेसच्या सत्ताधारी झेंडा कमिटीने हा राष्ट्रीय झेंडा म्हणून मान्य केला नाही, म्हणून दातओठ खात आहेत. राज्याभिषेकाच्या वेळी छ. शिवाजी महाराजांनी फडकाविलेला भगवा झेंडा साधा होता. त्यावर कसलेही चिन्ह नव्हते.आजही कोल्हापूरचा शिवपंरपरेचा भगवा झेंडा चिन्हाशिवाय साधा भगवा असाच आहे. हाच झेंडा महाराष्ट्र पूज्य नि वंदनीय मानतो. हिंदू महासभेचा कृपाण- कुंडलिनीचा झेंडा त्या ठराविक पंथाचा आहे. तो महाराष्ट्राचा, छ. शिवाजी महाराजांचा झेंडा मुळीच नाही. मराठा मंदिराचा झेंडा साधा भगवाच आहे. भगव्या झेंड्याच्या वादात हा महत्त्वाचा मुद्दा कोणीही नजरेआड करता कामा नये. छ. शिवाजी महाराजांचा झेंडा निराळा आणि सावरकरांचा झेंडा निराळा. दोन्हींचा रंग भगवा असला तरी परंपरेचे इतिहास निराळे आहेत.
डॉ. आंबेडकरांची झेंडा कमिटीवर नेमणूक झाली नि ते दादरला ३ जुलैला परत आल्यावर श्री. सुरबा टिपणीस त्यांच्या भेटीला गेले असता त्यांना ते म्हणाले, 'राष्ट्रध्वज ठरविण्याची कमिटी नेमली गेली, तरी आपल्या महाराष्ट्रात आपल्या भगव्या झेंड्याच्या आग्रहाची चळवळ कोठेच कशी नाही?' डॉ. आंबेडकर स्वाभिमानी मऱ्हाठे आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याचा त्यांना तिखट अभिमान आहे. तमाममहाराष्ट्राचे मऱ्हाठे. एकमुखाने भगव्या झेंड्याचा राष्ट्रध्वज म्हणून पुकारा करतील, तर दिल्लीच्या कमिटीलाही गंभीर विचार करावा लागेल, ही आंबेडकरांची भावना बरोबर होती.
महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहिला तर भगव्या झेंड्याची आपण कमिटीत जोरकस शिफारस करू अशी डॉ. आंबेडकरांची ग्वाही मिळताच सुरबा टिपणीस, मराठा मंदिराचे श्री. भिलारे नि गावडे यांना भेटले. ता. ४ जुलैला टिपणीस, अनंतराव चित्रे आणि भिलारे स्थानिक हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री. अनंतराव गद्रे यांना त्यांच्या बिऱ्हाडी जाऊन भेटले. अनंतरावांनी हिंदु महासभेचा हार्दिक पाठिंबा देण्याचे कबूल केले. ' मी भोपटकरांना तार पाठवतो आणि संध्याकाळी आपण सारेजन डॉ . आंबेडकरांना मुद्दाम भेटुन कार्याची दिशा ठरवून एकदम कामाला लागू ' असे अनंतरावानी आश्वासन दिले. त्यांच दिवशी संध्याकाळी सिध्दार्थ कॉलेजात दोन्ही संस्थांचे आणि भगव्या झेंडयाचे इतर अभिमानी डॉ. आंबेडकरांना भेटले. चर्चा झाली, कार्याची आखणी केली. दुसऱ्या दिवशी मराठा मंदिरचे अध्वर्य गावडे यांनी शंभर रूपये खर्चुन छ. शिवाजी महाराजांच्या अस्सल भगव्या झेंडयाचे दोन नमुने आणून डॉ. आंबेडकरांना दाखविले. 'चित्रा' वगैरे स्थानिक दैनिकांत भगव्या झेंडयाचा पुरस्काराचा जाहीरनामा गावडे यांनी प्रसिद्ध केला. ग्वाल्हेराधिपती जिवाजीराव शिंदे यांनी तारेने गावडे यांच्या खटपटीचा पुरस्कार केल्याचे समजते.
सदाशिवपेठी टिंगल
याच आठवडयात दादर येथील वनमाळी हॉलमध्ये अण्णासाहेब भोपटकर यांचे व्याख्यान होते. अनंतराव गद्रे आणि भोपटकर यांची तारातारी होणार होती. तेव्हा हे व्याख्यान भगव्या झेंडया च्या आग्रहासाठीच असावे, अशा अंदाजाने टिपणीस प्रभृती मंडळी मुद्दाम गेली. त्यांची फार निराशा झाली. सबंध व्याख्यानात काँग्रेसची ठराविक सदाशिवपेठी टिंगल आणि अगदी शेवटी भगव्या झेंड्याचा उगाच ओझरता उल्लेख ! हे हिंदू महासभावाले भगव्या झेंड्याच्या प्रश्नाला प्रामाणिकपणे पाठिंबा देणार आहेत, का इतर खटपट्यांची नुसती हुलकावणी करणार आहेत, याचा काहीच उलगडा होईना.
दुसऱ्या दिवशी मराठा मंदिराच्या ठाकूरद्वार रोडवरील कचेरीत गद्रे प्रभृती हिंदू महासभावाले, मराठा मंदिराची मंडळी नि इतर यांची सभा झाली. खंडेरावजी दौंडकर अध्यक्ष होते. एक संमिश्र कार्यकारी मंडळ नेमण्यात आले. कॉन्स्टिट्यूअंट असेंब्लीच्या मेंबरांना, जवाहरलाल, वल्लभभाई वगैरे दिल्लीपदस्थ अधिकाऱ्यांना तारा पाठवायच्या; ठिकठिकाणी सभा घेऊन त्यांचे ठराव पाठवावयाचे, वगैरे कार्यक्रम ठरले. शिवाय हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री. भोपटकर यांनी दिल्लीला जाऊन तेथे जोराची निदर्शने करायची, हा भाग महत्त्वाचा ठरविण्यात आला आणि तो पार पाडण्यात हिंदू महासभा किंचितही कसूर करणार नाही, अशी अनंतराव गद्रे यांनी हमी घेतली.
डॉ.आंबेडकरांचे आश्वासन
ता. १० जुलैला सकाळी हिंदू महासभेची गद्रे-बोले प्रभृती २५-३० मंडळी, मराठा मंदिराची अशीच २५-३० मंडळी मोटारीच्या मिरवणुकीने डॉ. आंबेडकरांच्या राजगृहावर आली आणि त्यांनी त्यांना दोन भगवे झेंडे अर्पण केले..महाराष्ट्राचा प्राचीन भगवा झेंडा, राष्ट्रध्वज ठरविण्याची कसोशी करण्याची विनंती करण्यात आली. डॉ. आंबेडकर म्हणाले, "आपण थोर थोर प्रातिनिधिक संस्थांची थोर थोर मंडळी असता हे काम माझ्यासारख्या एका 'महाराच्या पोरावर सोपवता, हा तुमच्या मनाचा थोरपणा आहे. खास दिल्लीत मला जर तुमचे भक्कम पुरस्काराचे पाठबळ मिळेल तरच हे कार्य मला साधेल '' नंतर सारेजण तसेच मोटारीतून मिरवणुकीने सांताक्रूझच्या विमानतळावर गेले. तेथेही पुन्हा भाषणे झाली. फोटो काढण्यात आले. विमानात पाय ठेवण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी पुन्हा आग्रहाने सांगितले की, अण्णासाहेब भोपरकरांना ताबडतोब दिल्लीला पाठवून द्या आणि तेथे येताच माझी भेट घ्यायला सांगा , म्हणजे पुढचे खास बेत ठरवता येतील.
माशी कुठे शिंकली
श्री. भोपटकर पाठोपाठ दिल्लीला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा जनरल सेक्रेटरी वगैरे सहाय्यकांचा लवाजामा होताच ! पण काय , कोठे माशी शिंकली कोण जाणे! त्यांच्यापैकी एकही असामी डॉ. आंबेडकरांना भेटली नाही. कमिटीत डॉ. आंबेडकरांनी भगव्या ध्वजाची बाजू मांडली. पण सार्वजनिक पाठिंब्याच्या अभावी त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे तिरंगी झेंड्याला मान्यता देण्यास कॉंग्रेस असेंब्लीत हिंदू महासभेचे बडे पुरस्कर्ते सर्वश्री अणे, खरेही बसले होते. पण त्यांनी चुकूनसुध्दा भगव्या झेंड्याचे नाव काढले नाही. अर्थात भगव्या झेंड्याचा प्रश्न गर्भातल्या गर्भात जिरवला गेला.
ही वस्तुस्थिती चूक आहे, असे हिंदू महासभेच्या म्होरक्यांनीच आता सांगितले पाहिजे.. अवसानघात त्यांनीच केलेला आहे. तेव्हा यापुढे भगव्या झेंड्याविषयी त्यांच्या किंचाळ्या फुकट आहेत. हिंदू राष्ट्रपती म्हणून मिरवणाऱ्या भोपटकरांना डॉ. आंबेडकरांसारख्या एका महाराच्या पोराला भेटणे कदाचित बेइज्जतीचे तर वाटले नसेल ना? काय असेल, त्याचा खुलासा त्यांनीच केलाच पाहिजे.
(केशव सीताराम ठाकरे)
राष्ट्रीय ध्वज म्हणून जो अशोकचक्र चिन्हांकित तिरंगी झेंडा स्वीकारण्यात आला होता, त्याचा थोडासा इतिहास ४-९-६० च्या 'टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाला होता. चरख्याऐवजी अशोकचक्र स्वीकारावे, ही कल्पना श्री. बद्रुद्दिन फैज हस्सन बद्रुद्दिन तय्यबजी व. त्यांची पत्नी यांनी गांधीजींच्या पुढे मांडली व गांधीजींनी संमती दिली. मग श्री. नेहरू यांनी घटना समितीत ठराव मांडला व अशोकचक्र चिन्हांकित तिरंगी झेंडा राष्ट्रध्वज म्हणून
मंजूर करण्यात आला. 'टाइम्स'ने दिलेला तो इतिहास असा :
To millions of Indians all over, the national tri-colour with the Ashoka Chakra epitomises their hopes and aspirations, but to one Indian, it means 'Q Wee little more. He and
his wife were instrumental in its adoption as the national flag of India.
The man : Badruddin Faiz Hassan Badruddin Tayabji, India's Ambassador at
Bonn. . I met 53 year old brilliant and amieble Ambassador last week when he spent a few days in the city... he joined Sir B. N. Rao in drafting the Constitution.
Shri. Tayabjis selected the Ashoka Chakra (instead of the spinning wheel) as the National emblem -- our choice was approved by Gandhiji after a little persuasion and Tayabji drafted the resolution of the national flag which Nehru moved in the Constituent Assembly.' (In person-By Pollux, The Times of India, Sunday, 4-9-1960).
(संदर्भ -1. खैरमोडे चांगदेव भवानराव, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १०, सुगावा प्रकाशन, पुणे.)
प्रा. प्रकाश दशरथराव कांबळे,
कला व वाणिज्य महाविद्यालय , सातारा.
मो. 9834451938
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |