01:16am | Jun 21, 2020 |
सातारा : भारतीय नौदल, लष्कर तसेच अर्धसैनिक बलांमध्ये भरतीचे आमिष दाखवून फलटण तालुक्यातील एका युवकाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कालच पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करीत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्या अटकेनंतर फलटण पोलिसांच्याही अनेक भानगडी बाहेर पडल्या असून त्याला साथ देणार्या फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील झारीतील शुक्राचार्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते काय कारवाई करतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाडळी बु॥ ता. फलटण येथील आकाश काशिनाथ डांगे (वय 27) या युवकाने भारतीय सैन्य दलामध्ये तसेच नौदलात नोकरीच्या भरतीचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे काल उघडकीस आले होते. आकाश डांगे याच्या विरोधात यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तसेच फलटण पोलिसांकडेही लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, फलटण पोलिसांनी आकाश डांगेच्या या देशद्रोही कृतीवर पडदा टाकण्याचे काम केले होते. साधारणत: चार महिन्यांपूर्वी आकाश डांगेचा पंटर असलेला व नात्याने चुलतभाऊ लागणार्या सचिन बाळासो डांगे (वय 30, रा. भाडळी बु॥ ता. फलटण) याच्यावर सैन्य भरतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सचिन डांगे यास काही महिने जेलची हवाही खावी लागली होती. सचिन डांगे प्रकरणाचा तपास करीत असताना तत्कालीन तपासी अधिकार्याला सचिन तर केवळ हिमनगाचे टोक असून खरा हिम पर्वत तर आकाश डांगेच्या रुपाने पाण्याखाली लपला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी ज्ञानेश्वर दळवी यांनी आकाश डांगेला चौकशीसाठी बोलविले असता आकाश डांगेचा नात्याने मामा लागणारा कापसे नावाचा वाळू माफिया फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख व फलटण शहरचा वाहतूक शाखेचा तत्कालीन कर्मचारी साहिल शेख यांनी संगनमताने दळवी यांच्यावरच लाचलुचपतचा ट्रॅप लावला. या ट्रॅपमध्ये ज्ञानेश्वर दळवी अलगद अडकले. दळवी यांच्यावरील एसीबीचा ट्रॅप यशस्वी झाल्यानंतर आकाश डांगेची मुजोरी वाढली. फलटण तालुकाच काय, तर आख्खा सातारा जिल्हाच मी खिशात घेवून फिरतो, अशा फुशारक्या तो मारु लागला. फलटण पोलीस दलातील अधिकार्यांसह कर्मचारीही आकाश डांगेला पाठिशी घालत असल्याने त्याची मुजोरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालली होती.
फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिंदे यांनी या प्रकरणातील दाहकता ओळखून व देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळणार्या आकाश डांगेच्या विरोधात थेट राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे लेखी तक्रार केली होती. तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत फलटण डिवायएसपींसह जिल्हा पोलीस प्रमुखांकडे आकाश डांगेवर कारवाईची मागणी केली होती. मात्र सातारा पोलिसांना या प्रकरणातील गांभीर्य न समजल्याने की, समजून न घेतल्याने (?) आकाश डांगे प्रकरण चार महिने बासनात गुंडाळले गेले होते. अखेर आकाश डांगेच्या पापाचा घडा पुणे पोलिसांनी फोडला.
कुरकुंभ, ता. दौंड येथील किशोर दादा जाधव या बेरोजगार युवकाला आकाश डांगे, नितीन तानाजी जाधव (रा. कल्पनानगर, ता. बारामती) या दोघांनी भारतीय नौदलामध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्याकडून 3 लाख 80 हजार रुपये घेतले होते. तसेच त्याला आयएनएस शिवाजी लोणावळा या ईमेल आयडीवरुन भारतीय नौदलाचे बनावट नियुक्तीपत्र पाठवले होते. त्यानंतर नियुक्तीपत्र मिळूनही नियुक्ती होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे किशोर जाधव याच्या लक्षात आल्यानंतर त्याने थेट पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. यावेळी जाधव याने संदीप पाटील याने याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. पाटील यांच्या हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आकाश डांगे व नितीन जाधवला ‘उचलण्याचे’ आदेश दिले.
परवा दि. 19 रोजी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आकाश डांगेची राहत्या घरातून, तर नितीन जाधवची बारामतीतून उचलबांगडी केली. त्यांना थेट भिगवण पोलीस ठाण्यात घेवून गेल्यानंतर त्यांनी सातारा-पुणेसह विदर्भ मराठवाड्यातील शेकडो युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून सुमारे 150 पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत डांगेसह जाधवचाही पाय अधिक खोलात जाणार आहे.
फिर्यादी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आकाश डांगेसह नितीन जाधव याच्याविरोधात फसवणुकीचा तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून त्यांना न्यायालयाने 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चार महिन्यांपूर्वीच आकाश डांगेवर झालेल्या तक्रारी व आरोपानंतर सातारा पोलिसांनी कारवाईची पावले उचलली असती तर देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे श्रेय सातारा पोलिसांना मिळाले असते. परंतू नालायक, बेमुर्वतखोर भ्रष्ट अधिकार्यामुळे सातारा पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे. या भ्रष्ट पोलीस अधिकार्यांची पुणे पोलिसांनी उचलबांगडी करण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करुन सातारा पोलिसांची प्रतिष्ठा जपावी, अशी मागणी होत आहे.
झारी, बनकर, शेख यांना सहआरोपी करा!
कोट्यवधी रुपयांचा बोगस सैन्य भरती घोटाळा काल पुणे ग्रामीण पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी सूत्रधार आकाश डांगेसह एकाला अटकही करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, कर्मचारी साहिल झारी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी आतापर्यंत आकाश डांगे याला पोलीसी कारवाईपासून वाचविण्याचे काम केले आहे. तसेच त्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाणही झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सहवासात व संपर्कात होते. आकाश डांगेने केलेल्या देश विघातक कृत्याची माहिती असूनही केवळ पैशाच्या लालसेपोटी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. त्यांच्या फोनवरील झालेल्या संभाषणाची सीडीआर काढल्यास दूध का दूध और पानी का पानी होणार आहे. एवढेच काय, आकाश डांगेने केलेल्या भानगडी पोटात घालून सहा दिवसांपूर्वीच पार पडलेल्या त्याच्या लग्नात कुरवल्याप्रमाणे हजेरी लावून त्यांनी सातारा पोलिसांची पर्यायाने राज्य पोलिसांची आब्रु धुळीस मिळवली आहे. त्यामुळे आकाश डांगेच्या पापाचे वाटेकरी असलेल्या झारी, बनकर, शेख यांना सहआरोपी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.
नौदल अधिकार्याच्या वेशातच बोगस नियुक्तीपत्रांची ‘खैरात’
काही वर्षांपूर्वी कॉलरला शेंबूड पुसणारा आकाश डांगे अल्पावधीतच अलिशान गाड्यांतून, किलोभर सोने गळ्यात घालून संपूर्ण महाराष्ट्रात पिंगा घालत होता. त्यामुळे भाडळी बु॥ सह पंचक्रोशीतील अनेकांना हे पोरगं नक्की करतंय तरी काय? अशी उत्सुकता लागली होती. फलटण तालुक्यात भरतीपूर्व प्रशिक्षण देणार्या अकॅडम्यांचा सुळसुळाट झाला होता. अशा चालकांना हाताशी धरुन आकाश डांगेने नौदलातील सब लॅफ्टनंट या पदावरील अधिकार्याचा ड्रेस शिवून घेतले होते. खिशावर नावाची पाटी, कॉलरवर दिमाखात मिरवणारे नौदलाचे बॅच व आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे समोरच्याला हा खरेच नौदलाचा बडा अधिकारी असल्याचे वाटायचे. त्यामुळे आकाशने युवकांना नौदल व लष्करात भरतीचे आमिष दाखवून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जसे मिळेल तसा त्याला ‘टाकण्याचा’ उद्योग आकाशने केला. शिवाय त्याने बोगस नौदल अधिकार्याच्या वेशातच नियुक्तीपत्रेही प्रदान केली. एवढा ‘जिगरा’ अशा लोकांच्यात येतोच कोठून?
डांगेचे लोणावळ्यातील नौदल कनेक्शन?
लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये आकाश डांगे याची सतत उठबस होती. नुकतीच आयएनएस शिवाजी ने स्थापनेची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. या संस्थेतील 75 वर्षात 2 लाखाहून अधिक नौदलातील सैन्य अधिकारी प्रशिक्षण घेवून बाहेर पडले आहेत. अशी उज्वल परंपरा असलेल्या ‘आयएनएस शिवाजी’ चाही आकाश डांगेने बाजार केला. आतमधील कोणाच्यातरी पाठिंब्यावरच आकाश डांगेने ही भानगड केली असावी, असा कयास पुणे ग्रामीण पोलिसांचा आहे. त्यादृष्टीनेही पुणे ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. तपासानंतरच यातील खरे गौडबंगाल समोर येणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |