महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी असलेल्या महिलेला बदली करतो, असे सांगून त्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. संशयिताने मंत्रालयातील महिला अधिकारी हे काम करुन देईल, असे सांगून पैसे उकळले आहेत.
शशिकांत साबळे व रावराणी मॅडम या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरेश जगन्नाथ भोसले (रा.सन्मतीनगर, फलटण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार महिलेचे सासरे आहेत.
जून 2014 त्या सासर्यासोबत जिल्हा परिषदेच्या विभागात आल्या होत्या. यावेळी शशिकांत साबळे याच्याशी त्यांची ओळख झाली. ’बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर मी बदली करुन देईन’, असे संशयिताने दोघांना सांगितले. त्यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर बदली होईल याची खात्री विचारली असता संशयिताने मंत्रालयात रावराणी मॅडम त्याच्या ओळखीच्या असल्याचे सांगितले. संबंधितांमध्ये बोलणे झाल्यानंतर तक्रारदार यांनी संशयिताला दीड लाख रुपये दिले.
पैसे मिळाल्यानंतर संशयिताने महिन्यात बदली होईल असे सांगितले. मात्र 2014 पासून अद्याप बदली झालेली नाही. यासाठी वेळोवेळी त्यांनी संपर्क साधला असता, बदली होईल, ऑर्डर येईल असे सांगून पैसे दिले नाहीत. यामुळे तक्रारदार यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दोघांविरुध्द फसवणुकीची तक्रार दिली.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी असलेल्या महिलेला बदली करतो, असे सांगून त्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. संशयिताने मंत्रालयातील महिला अधिकारी हे काम करुन देईल, असे सांगून पैसे उकळले आहेत.