वाई एमआयडीसीत बावळेश्वर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

by Team Satara Today | published on : 02 September 2026


वाई : येथील एमआयडीसी परिसरातील प्रसिद्ध बावळेश्वर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यात तयार ठेवलेल्या शेकडो गौरी-गणपतीच्या मूर्तींसह इतर साहित्य जळून खाक झाले असून, यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री कारखान्यातून धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती पसरताच मध्यरात्री परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
या दुर्घटनेत तयार मूर्ती आणि कच्चा माल जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे काम सुरू असून, त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देगावच्या १३.७० कोटींच्या जलजीवन योजनेवर संशयाची छाया

संबंधित बातम्या