वाई : विविध तक्रारी आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवरून वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जालिंदर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी करणे, होमगार्डला मारहाण झाल्याच्या प्रकरणात परस्पर तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, तसेच महिला तक्रारदार आणि महिला पोलीस अंमलदारांशी असभ्य वर्तन करणे, असे आरोप प्रदीप जाधव यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधीत जाधव यांची नियुक्ती सातारा येथील पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना पोलीस मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबनाच्या कालावधीत दररोज पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वाईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव निलंबित
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा