सातारा: साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवत, नवोदित तिरंदाज साहिल जाधवने चीनमधील शांघाई येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी चषक (वर्ल्ड कप) स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. कारकिर्दीतील केवळ दुसरीच विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या साहिलने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे पहिले पदक मिळवून देण्याचा बहुमान पटकावला. त्याने कम्पाउंड प्रकारात डेन्मार्कच्या अनुभवी तिरंदाज आणि प्रशिक्षक मार्टिन दामस्बो यांचा १४७-१४४ अशा फरकाने पराभव करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
या रोमहर्षक सामन्यात सुरुवातीला साहिल एका गुणाने मागे होता; मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्याने कमालीची अचूकता दाखवत सामन्यावर पकड मिळवली. साहिलने शेवटच्या नऊपैकी सात प्रयत्नांत अचूक वेध घेतला, तर दुसरीकडे अनुभवी मार्टिन यांना गुणांची आघाडी टिकवता आली नाही. या विजयापूर्वी साहिलने माजी विजेता निको विएनेर याला 'शूटऑफ'मध्ये पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, उपांत्य फेरीत जगज्जेत्या निकोलस जिरार्डकडून त्याला १४६-१४७ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात साहिलने १५ पैकी १२ वेळा अचूक वेध घेतला होता, परंतु एका बाणाचा 'प्लेज' (पंख) निघाल्याने त्याचा नेम चुकला आणि तिथे त्याला केवळ आठ गुणांवर समाधान मानावे लागले. हा तांत्रिक अडथळाच त्याच्या सुवर्णपदकाच्या मार्गातील मोठा अडसर ठरला.
कोरोना काळात वडिलांची नोकरी गेल्याने जाधव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. अशा कठीण परिस्थितीतही मुलाचे स्वप्न भंगू नये म्हणून साहिलच्या आईने स्वतःचे दागिने विकून त्याला धनुष्य-बाण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले. आईने दिलेल्या या पाठबळाचे साहिलने जागतिक स्तरावर सुवर्ण यश मिळवून चीज केले आहे. वारे वाहत असतानाही साहिलने दाखवलेला संयम आणि अचूकता यामुळे सध्या साताऱ्यासह संपूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.