सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (निकाळजे गट) अर्थात रिपाई ‘ए’ गटातील अंतर्गत नाराजी अखेर उघडपणे समोर आली आहे. पक्षात अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या २५ हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने जिल्ह्यातील पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये पाच महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील कथित एकाधिकारशाहीविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.
जिल्हा कार्यकारिणीकडून कनिष्ठ पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती अथवा निमंत्रण दिले जात नाही. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही. इतकेच नव्हे, तर विविध कार्यक्रमांच्या जाहिरात फलकांवरून पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रही जाणीवपूर्वक वगळले जात असल्याची त्यांची तक्रार आहे.
पक्षाच्या कार्यक्रमांसाठी आर्थिक योगदान दिले नाही, तर अपमानास्पद भाषेत बोलले जाते, असाही आरोप करण्यात आला आहे. पक्षवाढीसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असेल, तर संघटनेत काम करायचे तरी कशासाठी, असा सवालही नाराज पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व प्रकारांमुळे पक्षातील असंतोष वाढत गेला. अनेकदा नाराजी व्यक्त करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने अखेर सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे संबंधित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीची दिशा निश्चित केली जाणार आहे. वडार पँथरचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी विशाल भोसले, सलीम बागवान, शाहरुख शेख, राजेंद्र होटकर, दशरथ अडागळे, शेखर अडागळे, गौतम सावंत, वंदना सगळे, मनीषा खरात, पूनम निकाळजे आदी उपस्थित होते.
दरम्यान, २५ हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या या सामूहिक निर्णयामुळे रिपाई ‘ए’ गटाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाराज पदाधिकारी स्वतंत्र संघटनात्मक भूमिका घेणार की अन्य राजकीय पर्यायांचा विचार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रिपाइं ‘ए’ गटात अंतर्गत नाराजीचा उद्रेक; २५ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
पाच महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश; जिल्हा कार्यकारिणीच्या एकाधिकारशाही कारभारावर गंभीर आरोप
by Team Satara Today | published on : 04 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा