नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान; स्मृतिदिनी १४० जणांचे रक्तदान; क्रीडा संकुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार

by Team Satara Today | published on : 28 October 2026


सातारा : आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. डॉ. संदीप काटे आणि सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्ता बनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १४० जणांनी रक्तदान केले.
सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी नंदा जाधव या साताऱ्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय धावपटू असल्याचे सांगितले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी परिसरात क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रनर फाउंडेशनच्या माध्यमातून मॅरेथॉनविषयक कायमस्वरूपी दालन उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये नंदा जाधव यांनी मिळवलेल्या विविध पुरस्कारांचे जतन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्ता बनकर यांनी नंदा जाधव यांचे कर्तृत्व आपण लहानपणापासून पाहिले असल्याचे सांगितले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा व परिसरात क्रीडा क्षेत्राला पूरक मैदाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंदा जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा संकुल उभारण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साधले यांनी प्रास्ताविकात नंदा जाधव यांच्या क्रीडा कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष टी. आर. गारळे आणि आनंदराव कणसे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, उपसरपंच काशिनाथ गोरड, नितीन पाटील, सुजीत चावरे, महेश कदम, गिरीश ढेंबरे, उमेश कांबळे, राम कदम, राजेंद्र कामटे, ॲड. सागर जाधव, संजय गायकवाड, महेश जाधव, रमेश हलगेकर, अमोलभाऊ तांगडे, महेश गडकरी, एचडीएफसी बँकेचे कुलकर्णी, अर्चना देशमुख, हेमंत शिंदे, श्रीकांत देशमुख, किशोर मोरे, जगदाळे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. श्रीकांत देशमुख यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाईत सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा धुडगूस; सात जणांवर गुन्हे
पुढील बातमी
नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान; स्मृतिदिनी १४० जणांचे रक्तदान; क्रीडा संकुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार

संबंधित बातम्या