निलंबित दोन कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याची मागणी; महासंघाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन; निर्वाह भत्त्यावर कुटुंब चालविणे कठीण

by Team Satara Today | published on : 01 September 2026


सातारा  : जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलीच्या प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून निलंबित असलेल्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत पुनर्स्थापित करावे, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या सातारा जिल्हा शाखेने केली आहे.
कक्षसेवक शंकर हणमंत शिंदे आणि सफाईगार विशाल भुषण रावखंडे यांच्यावर 30 मार्च 2026 रोजी घडलेल्या मृतदेह अदलाबदलीच्या घटनेप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला
होता. त्यानंतर 31 मार्च रोजी त्यांना निलंबित करून अनुक्रमे कलेढोण व औंध येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यमुक्त करण्यात आले. दोघांनीही तेथे रुजू होऊन काम सुरू केले आहे.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्मचार्‍यांची जबाबदारी शवविच्छेदनावेळी डॉक्टरांना मदत करणे, मृतदेह व्यवस्थित गुंडाळणे आणि परिसराची स्वच्छता करणे एवढीच आहे. मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची असल्याने कर्मचार्‍यांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे.
निलंबन काळातील निर्वाह भत्त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने दोन्ही कर्मचार्‍यांनी 27 ऑगस्ट रोजी निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली असून, त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद करण्याची ग्वाही
पुढील बातमी
निलंबित दोन कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याची मागणी; महासंघाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन; निर्वाह भत्त्यावर कुटुंब चालविणे कठीण

संबंधित बातम्या