सातारा : बाबासाहेबांच्या आईच्या नावाचा पुरस्कार मोठा आनंद देणारा व भारावून टाकणार आहे. पुरस्कारापेक्षा विचार महत्त्वाचा आहे. तो कृतीतून सांभाळणे महत्त्वाचे आहे. महामानवांच्या समाज परिवर्तनाच्या पुरोगामी विचारांवर निष्ठा कायम ठेवण्याची व त्यावर मनापासून वाटचाल करण्याची ग्वाही रसिद्ध लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचा २८ वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार केंद्र सरकारच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख, इतिहास अभ्यासक, संशोधक, ढोर-चांभार समाजातील महिलांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान उजेडात आणणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते शानदार समारंभात देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. विचार मंचावर प्रतिष्ठानचे संघटक व माजी अध्यक्ष दिनकर झिंब्रे, अध्यक्ष रमेश इंजे, उपाध्यक्ष प्रशांत साळवे, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. सुनीता सावरकर म्हणाल्या, महात्मा फुले यांचे
कार्य पुढील टप्प्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेले. जाती व्यवस्था
मोडण्याचे व स्त्रियांना सन्मान देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची
माणूसपणाची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. समाज परिवर्तनाचे काम करताना
द्वेषाने नव्हे तर सत्य - असत्य तपासण्या साठी, एकमेकांना, समाजाला समजून
घेण्याची व वेळ पडल्यास माफ करण्याची गरज आहे.ज्ञानाच्या लोकशाही
करण्याची प्रक्रिया होण्याची गरज आहे.
महात्मा फुले जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकारक विचार मंथनावर पाच डिसेंबर अखेर होणाऱ्या संबोधी प्रतिष्ठानच्या या वर्षाच्या थोरांच्या -स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, डॉ. सुनीता सावरकर या फुले-आंबेडकर विचारांच्या पाईक आहेत. त्यांच्या सावरकर आडनावावरून बिचकण्याचे कारण नाही. महामानवांचा समाज परिवर्तनाचा विचार पुढे नेण्याचे त्यांच्या वंदनीय कार्याचा हा उचित सन्मान केला याबद्दल संबोधी प्रतिष्ठानला धन्यवाद. मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार हा कृतज्ञतेचा सोहळा आहे. वंदनीय जिजाऊनी देशाला छत्रपती शिवराय दिले व महामाता भिमाईने भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे विश्वरत्न दिले. त्यांचा विचार निष्ठेने समृद्ध करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचे संबोधी प्रतिष्ठानचे कार्य बाबासाहेबांच्या थोर माते प्रति कृतज्ञता बाळगणारे अभिनंदन असल्याचे मत डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड,शाहू महाराज, डॉ.आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांचे कार्य विशिष्ट समाजापुरते मर्यादित नाही. ते सर्वव्यापी मानव मुक्तीचे आहे. त्यांची चळवळ आपणच विद्रुप करतोय ते थांबले पाहिजे. सामाजिक परिवर्तनाचा त्यांचा विचार पुढे गेला पाहिजे. बुद्ध, कबीर,रविदास, नाथपंथी या सर्वांचा माणूस घडवण्याचा निकोप विचार एकच आहे, हे लक्षात घेण्याची गरज.
या कार्यक्रमात वाईचे आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुलकर्णी यांनी डॉ. सुनीता सावरकर यांचा विशेष सत्कार केला.
प्रारंभी संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, प्रसिद्ध कवयित्री रामकली पावसकर व पत्रकार विकास धुळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले.दिनकर झिंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन प्रशांत साळवे यांनी केले व डॉ. सुवर्णा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, डॉ. शिवाजीराव पाटील, बाबुराव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या आईच्या नावाचा पुरस्कार मोठा आनंद देणारा - डॉ. सुनीता सावरकर, डॉ. सावरकर यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्रदान
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा