माण : माण तालुक्यातील पळशी, रांजणी, मार्डीसह, परिसरातील माळीखोरा जाशी व वाड्या-वस्त्यांवर भीषण चाराटंचाई भासत असून, जून महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगामातील पिकेही पावसाअभावी करपू लागली आहेत. पाऊस झाला नसल्याने माळरानावरील गवत जळून गेले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसत आहे. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे.
परिसरातील ज्वारीची पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. विहिरींची पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मोही येथे दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यातच उन्हाळा जाणवत असल्याने पुढील काही दिवसांत परिस्थिती याहूनही बिकट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात शेतीला आधार म्हणून अनेकांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
गेल्या जून महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुग्ध व्यवसायातून दैनंदिन गरजा भागवल्या जात असल्या तरी जनावरांचा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक चाऱ्यासाठी शोधाशोध करत आहेत. आजूबाजूच्या गावातून तसेच माळशिरस, नातेपुते आदी परिसरातून शेतकरी अव्वाच्या-सव्वा दराने चारा विकत घेऊन जनावरे जगवताना दिसत आहेत.
माळरानं झाली ओसाड; दुष्काळाने पशुपालक बेजार, ओल्या चाऱ्याचे दर गगनाला, चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा