मुख्यमंत्री यांच्या वॉटर कप घोषणेनंतर सातारा जिल्ह्याची तात्काळ कृती! राज्यात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात पाणलोट व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

by Team Satara Today | published on : 28 November 2026


सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाणी फाउंडेशनच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची ' ची घोषणा केली. या घोषणेनंतर अवघ्या काही वेळातच सातारा जिल्ह्याने राज्यात एक आदर्श निर्माण करत जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे पाणलोट व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील  यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षणाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन विभाग, उमेद, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षक टीमने हे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाची सुरुवात एका अनोख्या पद्धतीने झाली. पाणी फाउंडेशनच्या टीमने सर्व अधिकाऱ्यांचे पाय धुऊन, कुंकुमतिलक लावून व औक्षण करून त्यांचे स्वागत केले. नियोजन भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणाची सुरुवात प्रशिक्षक अवधूत गुरव यांच्या प्रार्थनेने झाली.
विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास आणि तेथे श्रमदानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. त्यानंतर मास्टर प्रशिक्षक जितेंद्र फडतरे यांनी दुष्काळी गावांतील टँकरची गरज, त्यावरील खर्च आणि गावात पडणाऱ्या पावसाचे जलव्यवस्थापन यांची प्रभावी गणितांसह मांडणी केली.
सुखदेव भोसले यांनी पाणलोटाची कामे न झालेल्या गावाची आणि शास्त्रशुद्ध पाणलोटाची कामे झालेल्या गावाची तुलनात्मक मांडणी करून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच 'स्ट्रॉ गेम'च्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा आणि भूजल संवर्धनाची गरज उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
प्रशिक्षणाच्या शेवटी अधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त व प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांनी निवासी स्वरूपातही असे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, सर्व अधिकारी संपूर्ण वेळ प्रशिक्षणात उपस्थित राहिले आणि उत्स्फूर्त सहभागातून प्रशिक्षण यशस्वी झाले.
मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर त्याच दिवशी सर्व प्रशासकीय यंत्रणेला पाणलोट व्यवस्थापनासाठी सज्ज करण्याचा सातारा जिल्ह्याचा हा पुढाकार आगामी 'सत्यमेव जयते वॉटर कप  स्पर्धेच्या' प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतातील बांधाच्या कारणावरून कारंडवाडी येथे मारामारी; सातारा तालुका पोलीस ठाण्यातपरस्परविरोधी तक्रारी दाखल

संबंधित बातम्या