सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष अभयसिंह जगताप यांनी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक भूमिकेवर आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्याशी अनेक वर्षे निष्ठेने काम केल्याचे नमूद करत जगताप यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे योगदान दिल्याची भूमिका मांडली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार मतदान झाले असले, तरी अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा विचार झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघांची फेररचना करताना स्थानिक परिस्थिती, कार्यकर्त्यांच्या सूचना आणि राजकीय वस्तुस्थिती यांचा पुरेसा विचार होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेपासून ते मतदारसंघांच्या सीमांपर्यंतच्या निर्णयांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागत असताना वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भाजपविरोधात लढण्याची भूमिका मांडली जात असताना दुसरीकडे भाजपसोबत जाण्याच्या राजकीय भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शरद पवार यांच्याविषयीचा आदर आणि प्रेम कायम राहील, मात्र पक्षाच्या निर्णयांशी सहमत नसल्याने आपण राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माण-खटाव विधानसभा अध्यक्ष तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे माण-खटावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर काय परिणाम होणार, तसेच जगताप यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचा उद्रेक; अभयसिंह जगताप यांचा सर्व पदांचा राजीनामा, मतदारसंघ पुनर्रचनेसह पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर नाराजी
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा