वाई : शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा त्याग करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचे काम वाई तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील जोर (जोरवाडी) येथील सहा कष्टकरी शेतकऱ्यांनी केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोर या शाळेची शासनाच्या आदर्श शाळा उपक्रमांतर्गत निवड होऊन गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने सहा शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीची वडिलोपार्जित जमीन शाळेसाठी विनामोबदला अर्पण केली. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.
वाई तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आणि वाई शहरापासून तब्बल ४३ किलोमीटर अंतरावर वसलेल्या अतिदुर्गम जोर गावात शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, शाळेची भौतिक प्रगती व्हावी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या भावनेतून तुकाराम चिमाजी यादव, किसन बाबुराव यादव, चंद्रकांत राजू यादव, बबन रामा कोळी, धोंडीबा रामा कोळी आणि सदू राजू यादव या सहा शेतकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन शाळेसाठी दिली.
या जागेच्या हस्तांतरणाची नोंदणी प्रक्रिया वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण करण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांनी विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे जागेचे सर्व कायदेशीर दस्तऐवज जिल्हा परिषद, सातारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करून दिले. त्यामुळे जोर शाळेच्या भविष्यातील विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे. या प्रक्रियेसाठी वाईचे दुय्यम निबंधक ओंकार पवार, गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, शिक्षण अधिकारी मोरे, विस्तार अधिकारी तथा जोर ग्रामपंचायतीचे प्रशासक राहुल हजारे, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल संकपाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका शुक्ला भिलारे-पाटील यांनी सहकार्य केले.
पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची पेरणी!
सामान्य कुटुंबातील कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन गावच्या शाळेसाठी देण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जमिनीचा त्याग नसून गावाच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्याची केलेली गुंतवणूक आहे. या जागेवर शैक्षणिक सुविधांचा विस्तार होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, शाळेचा लौकिक वाढेल आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
वाई तालुक्यातील जोर येथील सहा शेतकऱ्यांच्या दातृत्वाचे परिसरातून कौतुक; शाळेसाठी स्वमालकीची जमीन केली दान
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा