सध्या भाजपविरोधात जनक्षोभ, भाजप २०२९ ची निवडणूक जिंकणार नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

by Team Satara Today | published on : 28 November 2026


कराड : केंद्र शासनाकडून मतदारसंघ पुनर्रचनेचे (डिलिमिटेशन) विधेयक घाईघाईने आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा वाढवून ८१५ ते ८५० करण्याचा मानस आहे. मात्र, जागांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ केल्यास संसदेतील सध्याचे तुलनात्मक संख्याबळ बदलून लोकशाहीच्या प्रतिनिधित्वाच्या रचनेवर परिणाम होईल. त्यामुळे या निर्णयाला काँग्रेसचा विरोध असून सरकारने हा निर्णय रद्द करावा, तसेच सध्या भाजपविरोधात जनक्षोभ असून २०२९ ची निवडणूक भाजप जिंकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी डिलिमिटेशन विधेयक, महिला आरक्षण आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करण्याचा सरकारचा प्रयत्न म्हणजे जनतेची दिशाभूल आहे. संसदेचे अधिवेशन २९ नोव्हेंबर रोजी तातडीने बोलावण्यात आले आहे. देशाच्या राजकीय आणि घटनात्मक रचनेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयावर सरकार एवढी घाई का करीत आहे? तसेच, घटनादुरुस्तीचा महत्त्वाचा विषय जनतेपासून गुप्त का ठेवला जात आहे?
विमान दुर्घटनेचा अहवाल सरकार का लपवतेय?
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, आमदार रोहित पवार यांनी स्वतः माहिती मिळवून या दुर्घटनेतील महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर आणल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या मुद्द्यांवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. असे असताना सरकार दुर्घटनेचा अहवाल जाहीर करण्यास विलंब का करीत आहे? असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील सोनवडीचे सुपुत्र जवान संग्राम खामकर यांना वीरमरण; परिसरावर शोककळा
पुढील बातमी
वाई तालुक्यातील जोर येथील सहा शेतकऱ्यांच्या दातृत्वाचे परिसरातून कौतुक; शाळेसाठी स्वमालकीची जमीन केली दान

संबंधित बातम्या