मुंबई : लोकसभेच्या सरसकट ५० टक्के जागा वाढवणार ही फसवेगिरीच आहे. यातून लोकसभेची जी तुलनात्मक संख्या आहे तो आकडा बदलणारच आहे. लोकसभेचे संख्याबळ वाढले तर तिथे काही चर्चा होणार नाही. पंतप्रधान सांगतील ते हात वर करायला लागेल. इतर देशात संसद सदस्य पंतप्रधानांचे गुलाम झालेत तशी परिस्थिती नको. तुलनात्मक संख्या वाढवू नका अशी आमची मागणी आहे. लोकसभेचे मतदारसंघ छोटे करण्यासाठी भाजपाला ८५० सदस्य करायचे आहेत. त्यामुळे उद्या फेरफार करताना आपल्या सोयीचे मतदारसंघ तयार केले जातील. तुलनात्मक संख्या बदलली तर दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल आणि त्यातून यादवी होण्याचा पाया घातला जाईल. १९५० साली अनेक संस्थानांनी संघराज्य करायचा निर्णय घेतला. संघराज्य करण्यामागे त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भूमिका होती. आज दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय झाला तर किती धोका होऊ शकतो हे सगळ्यांना माहिती आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकाला आमचा विरोध नाही, ही घटनात्मक तरतूद १९५० सालची आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होईल आणि त्यानंतर प्रत्येक राज्याच्या तुलनात्मक लोकसंख्येच्या आधारे एकूण लोकसभेच्या संख्येत फेरवाटप होईल अशी घटनेत तरतूद आहे. १९५१ च्या जनगणनेनंतर १९५२ साली, १९६१ च्या जनगणनेनंतर १९६२ साली फेरवाटप झाले आणि १९७१ च्या जनगणनेनंतर १९७२ साली फेरवाटप झाले. परंतु १९७६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असा विचार पुढे आला, ज्यात लोकसंख्येच्या आधारे वाटप करत गेलो तर उत्तरेकडे जिथं लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यात अपयश आले तिथे फायदा आणि दक्षिणेकडे ज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले त्यांचे नुकसान होईल. जिथं कमी लोकसंख्या तिथे खासदार कमी आणि जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात तुलनात्मक खासदारांची संख्या वाढेल म्हणून १९७६ साली व्यापक घटना दुरूस्ती विधेयक मंजूर केले आणि पुढच्या २५ वर्षासाठी लोकसभेची संख्या गोठून टाकली.
त्यानंतर २५ वर्षांनी म्हणजे २००१ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. त्यांनीही इंदिरा गांधी यांचा निर्णय कायम ठेवला आणि पुन्हा २५ वर्षासाठी जागा गोठवल्या. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांनी जागा गोठवण्याचा एकच निर्णय घेतला, नाहीतर दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय झाला असता. आमचा डिलिमिटेशनला विरोध नाही कारण ही घटनात्मक तरतूद आहे. मात्र १९७६ ची लोकसभेतील संख्या ठरली होती ती अजून गोठवा ही आमची मागणी आहे.लोकसभेची संख्या ५४३ वरून ८५० वाढवण्याला आमचा विरोध आहे. ही संख्या ५४३ राहावी असं आमचं म्हणणं आहे. जर ही संख्या ८५० केली आणि उद्या ती दुप्पट केली तर त्या लोकसभेला काही अर्थ राहणार नाही. आज चीनमधील संसदेतील सदस्य संख्या ५ हजार आहे. त्यांची बैठक ५ वर्षातून एकदा होते. आता ५४३ सदस्यांपैकी किती जणांना बोलायला मिळते? चहा, चिवडा आणि लाडू खाऊन फक्त हात वर करायची अशी संसद आपल्याला करायची आहे का? तुलनात्मक संख्या बदलू नका ही आमची मागणी आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
महिला आरक्षण तातडीनं लागू करा - चव्हाण
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. ही फसवणूक आहे. हा खोटारडेपणा, फसवेगिरी आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ साली संसदेने पारित केले आहे. इंडिया आघाडीने हे विधेयक एकमताने मंजूर केले. आमच्यासमोर जो विधेयक मसूदा ठेवला त्यात २०२३ ला विधेयक मंजूर झाल्यानंतर होणारी २०२७ जनगणना, त्यानंतर सीमांकन आणि त्यानंतर २०३४ साली लोकसभा निवडणूक होईल. हे आरक्षण २०३४ पासून लागू होईल हे सरकारने मसूद्यात मांडले. ते विधेयक आम्ही मान्य केले. मात्र जर सरकारला वाटत असेल चूक झाली तर ती दुरूस्त करून ताबडतोब महिला आरक्षण लागू करा. त्याला आमचा विरोध नाही. येणाऱ्या ५ विधानसभा निवडणुकीपासूनही महिला आरक्षण लागू करा, आमचा त्याला विरोध नाही. त्यामुळे सीमांकन विधेयक आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. ही फसवेगिरी आहे. महिला आरक्षणाचे नाव पुढे करून सीमांकन विधेयक मंजूर करायचे हा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
...तर राजकारण बदलून जाईल
लोकसभेचे ३१ खासदार महाराष्ट्रात निवडून आले. या खासदारांना जनतेने भाजपा आणि मोदींविरोधात मतदान करून निवडून आणलंय. आता जर तुम्ही त्यांच्यासोबत गेलात तर लोकांना उत्तर द्यावे लागेल. नेतृत्वाला आणि खासदारांना द्यावे लागेल. हे विधेयक पुन्हा संसदेत आणलं जातंय, त्याचा अर्थ दोन तृतीयांश आकडे भाजपाने जुळवले आहेत. इतके महत्त्वाचे विधेयक असताना गुप्तता का? या विधेयकातील ज्या तरतुदी आहेत त्यावर चर्चा व्हायला हवी. संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पाठवा. त्यात चर्चा होऊ द्या. डिलिमिटेशनला आमचा विरोध नाही पण चर्चा व्हायला हवी. हे विधेयक उत्तर आणि दक्षिण भारतासाठी महत्त्वाचे आहे. या विधेयकासाठी केले जाणारे मतदान उघड असते. मात्र खासदारांमध्येही फूट पडू शकते. जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यात आमचे नुकसान होणार आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील एक महत्त्वाचा पक्ष नसेल तर आमचे नुकसान होईल. आता त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा आहे. जर त्यांच्या कुटुंबातील मतभेद दूर झाले आणि एकवाक्यता झाली तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु एकवाक्यता झाल्यानंतर ते इंडिया आघाडीत राहणार की सत्तेसोबत जाणार हा खरा प्रश्न आहे. आमच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाने त्यांच्यासोबत जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. जर असं झाले तर राजकारण बदलून जाईल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
डिलिमिटेशन विधेयक व महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही, ही फसवेगिरीच; इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी एकच निर्णय घेतला, नाहीतर..; ५० वर्षांचा इतिहासच पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा