सातारा : घराला घरपण आणि मनाला शहाणपण येण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार समजून घेणे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परिवर्तनचे सुपरिचित वक्ते व सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर काळोखे यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व अध्यापिका विद्यालय, नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविनाश वाडकर तसेच महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी किशोर काळोखे म्हणाले की, आपले चरित्र आणि चारित्र्य घडवायचे असेल तर महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेचे सदस्य असताना दारूबंदीचा आग्रह धरणारे महात्मा फुले हे दूरदृष्टीचे समाजसुधारक होते. आजच्या तरुण पिढीने याच वयात व्यसनांना आणि वाईट सवयींना ठामपणे नकार देण्याची गरज आहे.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना मन अनुकरणशील असते. मात्र, जे दिसते ते नेहमीच तसे नसते. माणसाचे खरे सौंदर्य हे त्याच्या बाह्य रूपात नसून त्याने संपादन केलेल्या ज्ञानात असते. ज्ञानामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही दिसण्यात नसून बोलण्यात, वागण्यात आणि आपल्या कार्यातून निर्माण होत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच वयातील प्रेम आणि राग या दोन भावनांचे स्वरूप ओळखून त्यावर संयमाने विजय मिळवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच एका अनाथ व अनवाणी मुलीची प्रेरणादायी गोष्ट सांगून विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता, माणुसकी आणि सेवाभाव जोपासत देवमाणूस होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
यावेळी सौ. ऋतुजा शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या महान सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष अडसूळ, कृष्णात झगडे, गणेश नेवसे, के. वाय. नेवसे, श्री. शिदू नेवसे, यादव नेवसे, आकाश नेवसे, सौ. संगीता चव्हाण, सौ. जायकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पिसाळ यांनी केले, तर आभार आकाश नेवसे यांनी मानले.
घराला घरपण अन् मनाला शहाणपण येण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार आचरणात आणा - किशोर काळोखे, नायगाव येथे म. फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा