कटगुण : महात्मा फुले यांचे महान कार्य समाजापर्यंत पोहोचवत असतानाच त्यांचे विचार वर्तमानाशी जोडणे आणि त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे सर्व समाज खऱ्या अर्थाने सुधारणेकडे जाऊन शोषित, वंचित व पीडित समाजाला न्याय मिळेल", असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते वडूज पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
खटाव तालुक्यातील कटगुण येथील महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये ते "महात्मा फुले यांचे महान कार्य" या विषयावर बोलत होते. यावेळी महात्मा फुले ट्रस्टचे सुधीर गोरे, तसेच सर्व केंद्रप्रमुख,शेकडो विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते. या उपक्रमास गटविकास अधिकारी योगेश कदम आणि गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड यांनी प्रोत्साहन दिले. श्री. क्षीरसागर म्हणाले," महात्मा फुले यांचे कार्य लोकोत्तर आहे . तथापि त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वर्तमान काळाशी संबंध जोडून आपल्याला सुधारित आणि मानवतावादी, अन्यायमुक्त समाजनिर्मितीसाठी कसे प्रयत्न करता येतील हे पाहायला हवे .1880 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक असताना दारूबंदीचा ठराव मांडला .आज काय परिस्थिती आहे? केवळ दारूमुळे भारतामध्ये दरवर्षी किमान चार ते पाच लाख नागरिक मृत्युमुखी पडतात. त्यातील दीड ते दोन लाख नागरिक रस्ते अपघातात दारूमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखू बाबत सुद्धा तीच परिस्थिती आहे भारताच्या 20% जनता म्हणजेच तब्बल 30 कोटी लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखू सेवन करतात. म्हणजेच महात्मा फुलेंचा त्यावेळचा विचार आज वर्तमान काळात सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.
त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी खतफोडीचे बंड 1875 मध्ये घडवले .आजही शेतकऱ्याची अवस्था पाहता, कर्जबाजारीपणा पाहता महात्मा फुलेंचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या या संपूर्ण कार्यामुळे आज अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे . "शिक्षणाशिवाय तरण्याचा कोणताही उपाय नाही" असे ठामपणे सांगत असतानाच वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी 1848 मध्ये जेव्हा मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली तेव्हा त्यांना सावित्रीबाई फुलेंसह प्रचंड अपमान सहन करावा लागला. आज प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शाळांना आणि शिक्षकांना आपण महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे बळ देणे गरजेचे आहे. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी थेट नाभिकांचा संप घडवला आणि स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. आजही अनेक पातळ्यांवर स्त्रियांना पुरेसा सन्मान नाही. शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अशा स्वरूपात त्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाचे दर्शन घडविणारे भरपूर लेखन केले आणि समाजाला दिशा दिली.
आजही सकस लेखनाची गरज आहे. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह तसेच ;1864 मध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणून त्यांनी पुरोगामीत्वाची बीजे रोवली. सयाजीराव गायकवाड यांनी जेव्हा सत्कार केला तेव्हा मदत ती बाबत विचारले असता त्यांनी कोणतीही आर्थिक मदत स्वीकारली नाही. त्या ऐवजी "तुमच्या बडोदा संस्थानात शोषित, वंचित, पीडित ,मागास समाजाला आणि स्त्रियांना शिक्षण मोफत द्या" अशी विनंती केली. हा त्याग आणि समाजाप्रती तळमळ आजही अत्यंत गरजेची आहे. त्यांनी व्यक्तिद्वेष कधीही केला नाही. वैचारिक मतभेद असतानाही अनेक समकालीन समाजसुधारकांचा त्यांनी प्रचंड आदर केला .फक्त वाईट विचारांना आणि समाजाला मागे ओढणाऱ्या, अन्याय करणाऱ्या विचारांना विरोध केला आणि सहिष्णुता दाखवून दिली. 1888 मध्ये त्यांना महात्मा पदवी बहाल करण्यात आली .या सर्व पार्श्वभूमीवर वर्तमान काळाशी महात्मा फुले यांचे विचार जोडून त्यानुसार पावले उचलणे गरजेचे आहे."
श्री गोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
संविधान दिनाचे औचित्य आणि बालचमूचा उत्स्फूर्त सहभाग
यावेळी ग्रामस्थांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री क्षीरसागर यांनी बालक विद्यार्थ्यांशी संवाद साधला .26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. त्या अनुषंगाने त्यांनी बालचमुला काही प्रश्न विचारताच त्यांनी देखील अत्यंत उत्स्फूर्तपणे समाधानकारक उत्तरे दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले .तब्बल दोन वर्षे 11 महिने 18 दिवस इतके दिवस अपार कष्ट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि भारताला राज्यघटनेचा मोठा ठेवा बहाल केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी संत साहित्याचा सखोल अभ्यास करूनच राज्यघटना लिहिली. मूकनायक साप्ताहिकाच्या पहिल्याच पानावर संत तुकारामांच्या अभंगाचा डॉ. आंबेडकर यांनी उल्लेख केला असे संदर्भ श्री. क्षीरसागर यांनी दिले.
महात्मा फुले यांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या.
महात्मा फुलेंचे चिरंतन विचार वर्तमानाशी जोडणे गरजेचे: यशेंद्र क्षीरसागर, कटगुण येथे पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा