जगताप कॉलनीत स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा; पिस्तूल व काडतुसासह कोडोलीचा तरुण गजाआड

देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल असा ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 November 2026


​सातारा : शहरात बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. जगताप कॉलनी परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तेजस अशोक काळे (वय २७, रा. मांगवस्ती, कोडोली, सातारा) या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​सातारा शहर आणि परिसरात अवैध शस्त्रांची तस्करी तसेच वापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय माहिती संकलित करून संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. या मोहिमेदरम्यान २६ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना एका गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, जगताप कॉलनीतील चिरायू हॉस्पिटलनजीक असलेल्या मोकळ्या मैदानात एक तरुण देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत घोडके यांनी तातडीने कारवाईसाठी विशेष पथक रवाना केले.
​संबंधित परिसरात पोहोचल्यानंतर पथकाने मैदानाच्या सभोवतालच्या भागाची बारकाईने पाहणी केली आणि कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने परिसरात सापळा रचून दबा धरला. काही वेळातच राखाडी रंगाचे जॅकेट, पिवळा टी-शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलेला एक तरुण त्या मोकळ्या मैदानात आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पाळतीवर असलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घेराव घालून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
​पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मॅगझिनसह एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हे शस्त्र, काडतूस आणि त्याच्याकडील मोबाईल हँडसेट असा एकूण ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित तरुण हा तेजस अशोक काळे असल्याचे निष्पन्न झाले असून, शस्त्र बाळगण्यामागील त्याचा नेमका उद्देश आणि हे पिस्तूल त्याने कोठून आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी तेजस काळे याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
​पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सहायक फौजदार राजू मुलाणी, अतिश घाडगे, पोलीस हवालदार विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्नील शिंदे, स्वप्नील लोखंडे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ आणि इरफान मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कामगिरीबद्दल सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये प्रथमच दुर्मिळ 'स्कॉप्स घुबड'चे दर्शन; खुरटी व गवताळ वने जपण्याची गरज अधोरेखित
पुढील बातमी
स्वप्नातील घर साकारण्यासाठी 'रचना २०२६' वास्तू प्रदर्शनाला अवश्य भेट द्या : रवींद्र त्यागी

संबंधित बातम्या