सातारा : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक असताना प्रारूप यादीतून नावे वगळली गेल्याने अनेक नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा निवडणूक विभागाने पात्र मतदारांना यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या शनिवार आणि रविवारी (दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२६) जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव न दिसणाऱ्या नागरिकांना आपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी थेट संबंधित मतदान केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची मोहीम सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीची सखोल छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये तांत्रिक व अन्य कारणांमुळे अनेक मतदारांची नावे वगळली गेल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित आणि दुबार नोंदी असलेल्या नावांचा समावेश आहे. मात्र, या प्रक्रियेत काही पात्र मतदारांची नावेही अनावधानाने किंवा आवश्यक माहितीअभावी प्रारूप यादीतून वगळली गेल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाव वगळलेल्या नागरिकांना आपली बाजू मांडण्याची आणि आवश्यक पुरावे सादर करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ज्या नागरिकांची नावे प्रारूप यादीत नाहीत, त्यांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन बीएलओंकडे आवश्यक गणना प्रपत्र आणि ओळखपत्रासह इतर पूरक कागदपत्रे सादर करावीत, असे सांगण्यात आले आहे. यादीत नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर केवळ तक्रार न करता नागरिकांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नाव निश्चित करण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारून त्यांचा निपटारा करण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी नागरिकांकडे अत्यंत मर्यादित कालावधी शिल्लक राहिला आहे.
प्रारूप यादीतून नेमक्या कोणत्या कारणामुळे नाव वगळले गेले आहे, याची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या माध्यमातून आपले नाव आणि वगळण्यामागील कारण तपासून घ्यावे व विहित मुदतीत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी. जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी प्रशासन मैदानात; जिल्ह्यात दोन दिवस विशेष मोहीम
वगळलेल्या नावांचा शोध घेण्याची संधी; सर्व मतदान केंद्रांवर बीएलओंची पूर्णवेळ उपस्थिती
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा