सातारा : भारतीय हवाई दलाच्या जगप्रसिद्ध 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या थरारक हवाई प्रात्यक्षिकांनी सातारा शहराचे आकाश उजळून निघाले. शहीद जवानांच्या शौर्याला अभिवादन आणि हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याला हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीर जवानांसह देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना मानवंदना देण्यासाठी या विशेष एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात प्रथमच सातारा शहरात ही हवाई प्रात्यक्षिके पार पडली. सैनिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर तसेच शहरातील विविध भागांत विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साताऱ्याला शौर्य, पराक्रम आणि सैनिकी सेवेची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक पिढ्यांपासून येथील तरुण सैन्यदलात योगदान देत आहेत. या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या हवाई कसरतींनी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना अधिक दृढ केली.
या कार्यक्रमास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर एडवर्ड प्रिन्स आणि सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन रामनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी देशसेवा, बलिदान आणि भावी पिढीची जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन केले. आजची मुले आणि तरुण पिढी हीच उद्याची जबाबदार नागरिक असून, त्यांच्यामध्ये लहान वयातच देशसेवा आणि समाजसेवेची भावना रुजवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांच्या अखंड सेवेची आणि सर्वोच्च बलिदानाची जाणीव नव्या पिढीला होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रात्यक्षिकांमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलातील करिअरच्या संधींची माहिती मिळून संरक्षण दलात सामील होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सूर्यकिरण टीमच्या नऊ लढाऊ विमानांनी जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून केलेली अचूक आणि धाडसी उड्डाणे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. नऊ विमानांचा ताफा एकत्रितपणे कसरती करताना पाहणे प्रेक्षकांसाठी विलक्षण अनुभव होता. विमानांची एकमेकांना छेद देणारी उड्डाणे, वेगवान वळणे आणि वैमानिकांमधील अचूक समन्वय पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रत्येक कसरतीमागील सराव, तांत्रिक कौशल्य आणि शिस्त या प्रात्यक्षिकांतून दिसून आली. विमानांतून सोडण्यात आलेल्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या धुराने आकाशात तिरंगी रेषा उमटल्या, तसेच अवकाशात रेखाटलेल्या हृदयाच्या आकाराने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
हवाई प्रात्यक्षिके पाहण्यासाठी सैनिक स्कूलच्या मैदानासह शहरातील उंच इमारतींची छते, चार भिंती परिसर आणि ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावरही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उंच ठिकाणांहून दिसणाऱ्या या दृश्यांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याचे औचित्य साधून संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर आणि नागरिकांनी एकत्र येत समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचे स्मरण करून नागरिक कर्तव्यांची जाणीव जागवली. देशभक्ती, संविधानिक मूल्ये आणि भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य यांचा संगम घडवणारा हा एअर शो सातारकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.
आकाशात तिरंगी रंगांची उधळण; 'सूर्यकिरण'च्या थराराने सातारा मंत्रमुग्ध
नऊ लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी अवकाश दणाणले; हजारो विद्यार्थी आणि नागरिक झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा