आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सातारा जिल्ह्याची राज्यात द्वितीय क्रमांकावर झेप

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी गरोदर मातांना 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान; 771 मातांना योजनेचा लाभ

by Team Satara Today | published on : 26 November 2026


सातारा : राज्यात आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला असून ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश संपादन झाले आहे. यापुढेही आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासह शासकीय आरोग्य संस्थांवरील नागरिकांचा विश्‍वास अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजू भैया भोसले यांनी केले.
जिल्हा परिषद, सातारा येथील आरोग्य समिती सभागृहात गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी राज्यस्तरावरून ऑक्टोबर 2026 अखेर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थापन व माहिती प्रणालीच्या अहवालानुसार आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सातारा जिल्ह्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीला प्रोत्साहन; 771 मातांना 5 हजार रुपयांचा लाभ
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, माता व बालकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील नागरिकांचा विश्‍वास वाढविणे या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती राजू भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र येथे प्रसूती झाल्यास संबंधित गरोदर मातेला 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी येणार्‍या मातांना प्रोत्साहन मिळणार असून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.
दिनांक 15 ऑगस्ट 2026 ते 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 771 प्रसूती झाल्या आहेत. या योजनेतील लाभार्थींना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती राजू भोसले यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यासाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकार्‍यांमार्फत अनुदान वितरणाची कार्यवाही करण्यात येत असून, सर्व पात्र लाभार्थींना वेळेत लाभ मिळावा यासाठी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या लाभार्थी श्रीमती दिपाली योगेश चव्हाण (ठोसेघर), श्रीमती उज्वला तानाजी वाघमळे (कण्हेर), श्रीमती वंदना सुरज गुप्ता (नागठाणे), श्रीमती शितल प्रदीप पाटोळे (नागठाणे) आणि श्रीमती साक्षी ओंकार प्रभावळे (खेड) यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
शासकीय संस्थांमधील प्रसूतीत कराड व खटाव तालुक्यांची उल्लेखनीय कामगिरी
सन 2026-27 मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 412 प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये कराड तालुक्यात 276 तर खटाव तालुक्यात 253 प्रसूती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये झाल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित तालुका आरोग्य अधिकार्‍यांचा सभापती राजू भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इतर तालुक्यांमध्येही शासकीय आरोग्य संस्थांतील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर
बैठकीमध्ये विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवांची संख्या वाढविणे, प्रसूती सेवा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी कझत लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता पात्र लाभार्थींनी हे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्याबाबत शिक्षणाधिकार्‍यांना निर्देशित करण्यात आले.
या बैठकीस आरोग्य समितीच्या सदस्या सौ. राजेश्‍वरी भोसले, सौ. संध्यारजनी भोसले-पाटील, लालासाहेब जगदाळे, सौ. प्रियांका साळुंखे, कु. शिवांजली भोसले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, सर्व गटविकास अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाच्या यशानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावणे, शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढविणे आणि माता-बाल आरोग्य अधिक सक्षम करणे, या उद्दिष्टांसाठी आरोग्य विभागाने समन्वयाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शहीदाच्या स्मारकासाठीचा निधी कुठे गेला? ओंबळे कुटुंबाचा सवाल

संबंधित बातम्या