संविधानातील मूल्यांचे आचरण हीच लोकशाही बळकट करण्याची गुरुकिल्ली : प्रा. डॉ. प्रकाश कांबळे

by Team Satara Today | published on : 26 November 2026


सातारा :  भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रत्यक्ष आचरण करणे हीच भारतीय लोकशाही बळकट करण्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय सावंत होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधान सभेचे कार्य सविस्तरपणे उलगडून सांगितले. संविधानाच्या जडणघडणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले अनन्यसाधारण योगदान आणि भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये यावर त्यांनी प्रकाश टाकला. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व अधिकार प्रदान केले आहेत. या अधिकारांबरोबरच सामाजिक न्याय, समान संधी आणि बंधुभावाची शाश्वत मूल्ये संविधानाने अधोरेखित केली आहेत. आजच्या युवा पिढीने केवळ संविधानाचे वाचन न करता त्याचा सखोल अभ्यास करावा आणि त्यातील उदात्त मूल्ये आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आचरणात आणावीत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी संविधान हा भारतीय लोकशाहीचा सर्वात भक्कम आणि मूलभूत आधार असल्याचे नमूद केले. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक समता, सहिष्णुता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करावी. संविधानाप्रती आदर बाळगून देशाचा एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेंद्र सातपुते यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. भरत जाधव यांनी केले. शेवटी प्रा. डॉ. जमीर मोमीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास उपप्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यशवंत विचारांच्या जिल्ह्यातच 'यशवंतरावां'चा विसर? पुण्यतिथीदिनी पोवई नाका येथील पुतळा हार-फुलांविनाच; नागरिकांमधून तीव्र संताप

संबंधित बातम्या