सातारा : सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डी वरील वाढे (ता. सातारा) येथील वेण्णा नदीवरील पुलाच्या बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 94 हजार 500 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. 17 ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निलेश मधुकर कदम (वय 44, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कदम हे हरियाणातील कालुवाला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत वाढे येथे वेण्णा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे.
17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 ते 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बांधकामाच्या साईटवर प्रवेश करून साहित्याची चोरी केली. यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे 32 गर्डर स्टेचिंग बेअरिंग, 35 हजार रुपयांचे 100 लोखंडी यू-जॅक, 38 हजार रुपयांचे 50 कप-लॉक व्हर्टिकल, 84 हजार रुपयांच्या 20 सी चॅनेल आणि 97 हजार 500 रुपये किमतीच्या 1 हजार 500 किलो लोखंडी सळ्यांचा समावेश आहे. एकूण 2 लाख 94 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार आवळे करीत आहेत.
वाढे येथे वेण्णा नदीवरील पुलाच्या बांधकाम साईटवरून 2 लाखांचे साहित्य लंपास; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा