तारळे : येथील 'तारळे पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट' या कंपनीचे विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही मनसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले.
पाण्यात उतरून निदर्शने आणि 'जलसमाधी'चा प्रयत्न: करण्यात आला. आंदोलनाचा पारा चढत असताना काही संतप्त कार्यकर्त्यांनी थेट धरणाच्या पाण्यात उतरून 'जलसमाधी' घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पाण्यात उभे राहून जोरदार निदर्शने केली. कंपनीकडून कोणतीही आवश्यक परवानगी न घेता शासकीय नियमांची पायमल्ली करून काम सुरू होते. तारळी धरणात अनधिकृत भराव टाकणे, शेकडो झाडांची कत्तल करणे आणि दिवस-रात्र ब्लास्टिंग व उत्खनन सुरू असल्याने स्थानिक शेतकरी, नागरिक व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या कामामुळे 'वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२' आणि 'महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४' मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या संदर्भात मनसेने यापूर्वी दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी कंपनीला काम बंद करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता मनमानी कारभार सुरूच ठेवला होता.
प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर मनसेचा संताप
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, ॲड. विकास पवार, युवराज पवार, गोरख नारकर, राहुल पवार यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत इशारा दिला की, "विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळायच्या आणि धरणाच्या पाण्यावर व भूमिपुत्रांच्या अश्रूंवर विकासाचे ढोल बडवायचे, हे आता चालणार नाही. दिवस-रात्र ब्लास्टिंग आणि उत्खनन सुरू असताना प्रशासन झोपलंय का? सामान्य माणसाने एक दगड जरी हलवला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, मग बलाढ्य प्रकल्पांनी अख्खे धरण गिळंकृत केले तरी त्यांना अभय का? हे दुटप्पी धोरण मनसे कदापि खपवून घेणार नाही."
स्थानिक शेतकरी, नागरिक आणि वन्यजीव प्रेमी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन समन्वय साधल्याशिवाय आणि योग्य उपाययोजना केल्याशिवाय कंपनीने कामकाज सुरू करू नये. कंपनीने पुन्हा परस्पर काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हे आंदोलनात सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार, धैर्यशील पाटील, ॲड. विकास पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच गोरख नारकर तालुकाध्यक्ष, पाटण राहुल पवार शहराध्यक्ष, सातारा, सागर बर्गे शहराध्यक्ष, कराड/, रणजीत कदम तालुकाध्यक्ष, कराड उत्तर, दयानंद नलावडे, सतीश यादव तालुकाध्यक्ष, कराड दक्षिण,सागर बर्गे तालुका अध्यक्ष कोरेगाव सौरभ झेंडे तालुकाध्यक्ष, सातारा, अविनाश दुर्गावले तालुकाध्यक्ष, जावली, राजेंद्र बावळेकर तालुकाध्यक्ष, महाबळेश्वर, मयूर नळ तालुकाध्यक्ष, वाई नितीन महाडिक यांच्यासह मनविसे जिल्हा संघटक विनायक भोसले, सागर कट्टे-पाटील, जिल्हा सचिव अमोल कांबळे, चंद्रकांत बामणे, हणमंतराव भिंगारदिवे, विश्वास संकपाळ, अझर शेख, ओंकार साळुंखे, डॉ. चिंदे अक्षय रणदिवे,आकाश सावंत,झुंझार यादव, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह शेकडो मनसैनिक व स्थानिक ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
तारळे प्रकल्पावर मनसेचे आक्रमक ठिय्या आंदोलन; कार्यकर्त्यांचा धरणाच्या पाण्यात उतरून 'जलसमाधी'चा प्रयत्न, प्रकल्पाचे काम बंद पाडले
by Team Satara Today | published on : 24 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा