सातारा : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवरून साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. सोळशी आणि बोंडारवाडी धरणांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट जुन्या सत्ताकाळाची आठवण करून देत प्रत्युत्तर दिले. सत्ता, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी असतानाही हे प्रकल्प मार्गी का लागले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर कोकणातून समुद्राकडे जाणाऱ्या पाण्याचा वापर मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शिवेंद्रराजे यांनी जोरदार समर्थन केले. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध पाणी समुद्रात जाऊ देण्यापेक्षा त्याचा शहराच्या गरजांसाठी उपयोग करणे ही दूरदृष्टी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयावरून राजकीय चर्चा सुरू असतानाच माण-खटावच्या पाणीप्रश्नावर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. उरमोडी योजनेमुळे या भागातील शेतीला पाणी उपलब्ध झाले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडत असल्याचा दावा त्यांनी केला. माण-खटावमधून अजिंक्यतारा कारखान्याला ऊस येत असल्याचे सांगत त्यांनी सिंचन योजनांच्या परिणामकारकतेकडे लक्ष वेधले.
सोळशी धरणाबाबत सरकारने माघार घेतलेली नसून त्याची शासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. जावळीतील बोंडारवाडी धरणासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सिंचन योजनांबाबत सरकार सकारात्मक आहे. स्थानिक विरोध आणि अन्य अडथळे दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धरणांचे श्रेय की अपयशाची जबाबदारी?
जिल्ह्यातील पाणीप्रश्न हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय न राहता प्रत्यक्षात किती सिंचनक्षमता निर्माण झाली, किती शेतजमीन ओलिताखाली आली आणि रखडलेले प्रकल्प कधी पूर्ण होणार, या प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची ठरणार आहेत. सोळशी आणि बोंडारवाडीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेला संघर्ष आता विकासकामांच्या श्रेयासोबतच पूर्वीच्या सत्ताकाळातील निर्णयांचीही चर्चा घडवून आणणारा ठरत आहे.
सिंचनाच्या प्रश्नावर राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी; शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दाखवला जुन्या कारभाराचा आरसा
सोळशी-बोंडारवाडीचा रखडलेला विषय कुणामुळे? असा सवाल; कोयनेच्या पाण्याच्या मुंबई वळवणीचे केले समर्थन
by Team Satara Today | published on : 24 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा