फलटण : साखरवाडी (ता. फलटण) येथील दत्त इंडिया साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर निवृत्त कामगारांच्या थकीत भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. प्रशासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याने, येत्या पाच तारखेपर्यंत कामगारांचे पैसे न दिल्यास थेट कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीत जाऊन बसण्याचा सज्जड इशारा साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे.
दत्त इंडिया साखर कारखान्याकडे निवृत्त कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम गेल्या आठ ते दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. या थकीत देण्यांसाठी निवृत्त कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या संदर्भात प्रशासनासोबत काही बैठकाही पार पडल्या, मात्र केवळ आश्वासनांशिवाय कामगारांच्या हाती काहीच लागले नाही. हक्काची रक्कम मिळत नसल्याने अखेर संतापलेल्या निवृत्त कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाचा सातवा दिवस उलटूनही कारखाना व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, अशी माहिती फलटण तालुका साखर कामगार युनियनचे माजी सेक्रेटरी आणि सेवानिवृत्त कामगार मारुती माडकर यांनी दिली.
दरम्यान, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला. यावेळी कारखाना प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना तात्यासाहेब काळे म्हणाले की, दत्त इंडिया ही एवढी मोठी कंपनी असताना गोरगरीब निवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी कारखान्याच्या गेटसमोर का रडायला लावले आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. मला बाकी कोणत्याही गोष्टींशी देणेघेणे नाही, फक्त माझ्या कामगारांचे थकीत पैसे तात्काळ द्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. येत्या पाच तारखेपर्यंत कामगारांनी पैशांची वाट पाहावी आणि तरीही प्रशासनाला जाग न आल्यास थेट उसाच्या गव्हाणीत जाऊन बसावे, असे आवाहन करत त्यांनी कारखाना व्यवस्थापनाला थेट इशारा दिला आहे.
या धरणे आंदोलनाप्रसंगी फलटण तालुका साखर कामगार युनियनचे पदाधिकारी आणि निवृत्त कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रकाश चव्हाण, राजाभाऊ गायकवाड, संतोष पैलवान, सुरेश भोसले, निवृत्ती भोसले, नितीन भोसले, वसंतराव जाधव, तुकाराम भोसले, सुधीर सहस्त्रबुद्धे, गोरख पवार, रामभाऊ फडतरे, राजाभाऊ फडतरे, रामभाऊ कांबळे, कुंडलिक भोसले यांच्यासह इतर सेवानिवृत्त कामगार सहभागी झाले होते. आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन पाच तारखेपूर्वी कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कामगारांचे थकीत पैसे न दिल्यास पाच तारखेला थेट गव्हाणीत उतरून आंदोलन छेडण्याचा तात्यासाहेब काळे यांचा इशारा
by Team Satara Today | published on : 24 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा