दहिवडी : माण तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालक हवालदिल झाले असून, जनावरांच्या चाऱ्यासाठी अखेर त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. जनावरांसाठी तातडीने चारा डेपो सुरू करावा, फळबागा जगवण्यासाठी अनुदान द्यावे, शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी बिजवडी येथे जनावरांसह तब्बल चार तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध शेतकरी संघटना आणि पशुपालकांच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनात जनावरे, शेळ्या-मेंढ्यांना रस्त्यावर आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, अन्यथा संबंधित शासकीय कार्यालयात जनावरांसह घुसून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
आंदोलनस्थळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, या आंदोलनातून शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. माण तालुक्यात जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगणारे शासन प्रत्यक्षात मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. आंदोलन केल्याशिवाय हे सरकार काहीच देत नाही. शेतकरी लाखो रुपयांच्या आर्थिक संकटात असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. शेतकऱ्यांना एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असेल, तर त्याविरोधातही शेतकऱ्यांनी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, माण तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून रब्बी हंगामाचीही आशा धूसर झाली आहे. हातात पीक नाही, उत्पन्नाचे साधन नाही आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी फळबागा धोक्यात आल्या असून शेळ्या-मेंढ्यांच्या पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोरही उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष मदत करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी प्रभाकर देशमुख, आ. हर्षदा देशमुख, अनिल देसाई, काशिनाथ शेवते, अभयसिंह जगताप, सभापती विक्रम शिंगाडे, अभिजीत घोरपडे, प्रशांत विरकर, अक्षयमहाराज भोसले, माऊली सरगर, प्रमोद गाडे, धनंजय महामूलकर, राजू मुळीक, बाळासो रणपिसे, महेश करचे आदींनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत भूमिका मांडली. आंदोलनाचे सूत्रसंचलन संदीप भोसले यांनी केले.
बिजवडी येथे जनावरांसह शेतकऱ्यांचा चार तास रास्ता रोको; भीषण दुष्काळीमुळे शेतकरी, पशुपालक हवालदिल
आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
by Team Satara Today | published on : 24 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा