जिल्हा बँकेतील १०० कोटींच्या खरेदीचे गैरव्यवहार बाहेर काढणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 24 November 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीत झालेले गैरव्यवहार लवकरच बाहेर काढले जातील, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गोंदवले येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावरही राजकीय टीकास्त्र सोडले.
जिल्हा बँक निवडणूक आणि पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. जिल्हा स्तरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात जागा निवडून आल्याचे गणित पालकमंत्री देसाई यांनी मांडले होते. त्यावर बोलताना मंत्री गोरे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेची निवडणूक आता संपली असून वाद घालण्यात वेळ घालवायचा नाही, मात्र त्यांच्यात लढण्याची पूर्ण धमक आहे. महायुतीचा धर्म पाळून पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसारच आपण युती केली आणि निवडणूक प्रक्रियेत थांबण्याचा निर्णय घेतला. जर युती केली नसती, तर अर्जुन काळे यांच्याप्रमाणेच आमचे सात संचालक सहज निवडून आले असते, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. महायुतीचा धर्म न पाळता अर्जुन काळे यांचा पराभव करण्याचे सर्व प्रयत्न करणे इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, असा टोलाही त्यांनी देसाई यांना लगावला.
जिल्हा बँकेच्या कारभारावर भाष्य करताना मंत्री गोरे यांनी बँकेतील १०० कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता जिल्हा बँक ताब्यात आली असून शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला कारभार केला जाईल. बँकेत झालेले सर्व गैरव्यवहार शोधून ते जनतेसमोर आणले जातील आणि शंभर कोटींची लॅपटॉप खरेदी नेमकी कुठे झाली आहे, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी बिजवडी येथील रास्ता रोको आंदोलनादरम्यान केलेल्या टीकेलाही मंत्री गोरे यांनी उत्तर दिले. दुष्काळी आढावा बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, जर पाण्याबाबत इतकाच कळवळा होता, तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री असताना जिहे-कठापूर आणि उरमोडी सिंचन योजनांची कामे का पूर्ण केली नाहीत. या दोन्ही योजनांचा थेट फायदा कोरेगाव मतदारसंघाला होणार होता, परंतु त्या काळात कामे रखडली. याच निष्क्रियतेमुळे जनतेने निवडणुकीत नाकारले असल्याची टीका गोरे यांनी शिंदे यांच्यावर केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा सर्व यंत्रणांनी निर्विघ्नपणे पार पाडावी - ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

संबंधित बातम्या