सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर विलीनीकरणाचा विषय तूर्तास थांबला आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
अजितदादांच्या माध्यमातून विलीनीकरणाबाबत झालेली चर्चा पूर्ण होऊ शकली नाही, याचे दुःख असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीचे आठही खासदार एकत्र असून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत काम करत आहेत. निलेश लंके, अमोल कोल्हे यांच्यासह बीड आणि नाशिकमधील खासदारांशी अलीकडेच संपर्क झाला आहे. सर्व खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाशी समन्वय ठेवून आहेत. त्यामुळे कोणीही पक्ष सोडणार नसून खासदारांच्या पक्षांतराच्या बातम्या केवळ वावड्या आहेत, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
इतर पक्षांतील अंतर्गत वाद आणि कार्यकर्त्यांची विधाने हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो. त्यांनी शिस्तीत वाटचाल करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, तेथील वादावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही पक्षातील दुफळीचा फायदा घेऊन राजकारण करण्याची राष्ट्रवादीची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात सातारा जिल्ह्यातील जनतेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवर काम करत पक्षाची भूमिका पटवून देण्यात येईल. जनतेच्या विश्वासाच्या बळावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राहील, असा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला.
कुर्ल्यातील मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी
दरम्यान, कुर्ल्यातील एका मॉलमधील गार्डनमध्ये युवक आणि युवतीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. अशा प्रकारे मारहाण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मारहाण करणारे कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहेत, यापेक्षा त्यांनी केलेले कृत्य महत्त्वाचे आहे. या घटनेला जातीय किंवा धार्मिक अथवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न न करता दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली.
विलीनीकरणाची चर्चा थांबली; राष्ट्रवादीचे आठही खासदार शरद पवारांसोबत ठाम - शशिकांत शिंदे
खासदार पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निव्वळ वावड्या; सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम सुरूच राहणार
by Team Satara Today | published on : 23 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा