सातारा : अकॅडमीतून तन्वी हिला का काढले, असा जाब विचारत एका अकॅडमी चालकाच्या पतीकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली. पैसे न दिल्यास छेडछाडीची पोलीस तक्रार करून अकॅडमी बंद पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवी चौक, गोडोली येथे राहणाऱ्या पूजा सुनील गाढवे (वय ३२) यांच्या घरी संशयित आरोपींनी जाऊन त्यांच्या पतीला अकॅडमीतून तन्वी हिला का काढले, असा जाब विचारला. यानंतर एक लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर छेडछाडीची पोलीस ठाण्यात तक्रार देऊन तुमची अकॅडमी बंद पाडू, अशी धमकी देत पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पूजा गाढवे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्वी सुभाष वनारसे, सुभाष वनारसे (दोघे रा. शाहूनगर, गोडोली), एक अनोळखी २० ते २२ वर्षांचा तरुण आणि दर्शना वाघ (रा. चंदननगर, कोडोली, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.
अकॅडमीतून विद्यार्थिनीला काढल्याच्या कारणावरून एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
पैसे न दिल्यास छेडछाडीची तक्रार करून अकॅडमी बंद पाडण्याची धमकी; चौघांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा