सातारा : आपण एटीएस विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती दाखवत एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५८ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे खोटे व्हेरिफिकेशन करून संशयिताने आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम उकळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ विद्याधर लाटकर (वय ६२, रा. १३२, मंदार बंगला, एलआयसी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जनता सहकारी बँकेसमोर असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणाऱ्याने स्वतःला 'अपराधीक जाँच कार्यालय' या नावाने ओळख करून दिली. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल करून आपण एटीएस विभागाचा अधिकारी असल्याचे भासवले.
लाटकर यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून अटक होण्याची भीती दाखवली. तसेच खोटे व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने त्यांना पैसे हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार २८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संशयिताने दिलेल्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे एकूण ५८ लाख ५० हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले.
त्यानंतर लाटकर यांनी वारंवार पैसे परत मागितले; मात्र संशयिताने रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी लाटकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांकावरील अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३३६(३), ३१९(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख करीत आहेत.
एटीएस अधिकारी असल्याचे भासवून साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकाला ५८.५० लाखांचा गंडा
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवून फसवणूक; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 23 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा