फलटण : तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद-फलटण मार्गावर वाहनातून जनावरांची दाटीवाटीने आणि चारा-पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सुदाम गाडे (वय २८, रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) आणि धनंजय आनंदराव चौधरी (रा. भोंगवली, ता. भोर, जि. पुणे) हे दोघे सुझुकी कंपनीच्या कॅरी (क्र. एमएच १२ एचजे २६६६) या वाहनातून एक गावठी गाय, एक गावठी बैल आणि एक वासरू यांची वाहतूक करीत होते. जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना वाहनात दाटीवाटीने कोंबून नेले जात असल्याचे पोलिसांना आढळले.
ही घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास तरडगाव येथील आमंत्रण हॉटेलसमोर लोणंद-फलटण रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयवंत यादव यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दोघांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०चे कलम ११ व ११(१)(ड) तसेच मोटार वाहन कायदा कलम १९२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.
वाहनात दाटीवाटीने जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल, तरडगाव येथे आमंत्रण हॉटेलसमोर पोलिसांची कारवाई
by Team Satara Today | published on : 23 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा