लाडकी बहीण योजनेचा राजकीय फायदा घेतल्यानंतर पात्रतेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करू नये - डॉ. फौजिया खान

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राजकीय फायदा घेतल्यानंतर आता लाभार्थी महिलांची नावे का कमी करण्यात आली, याचा सरकारने खुलासा करावा. पात्रतेच्या नावाखाली महिलांची कपात करून त्यांची फसवणूक करू नये. ही योजना बंद न करता सुरू ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली.
साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. आशा मिरगे, कविता म्हेत्रे, अर्चना देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फौजिया खान पुढे म्हणाल्या, दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून, त्यांच्या पाणी, रोजगार, आरोग्य, पोषण आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद करून महिलाकेंद्रित आपत्ती निवारण धोरण राबवावे, अशी मागणी डॉ. फौजिया खान यांनी केली.
दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर घराघरांत सर्वेक्षण आणि महिला जनसंवाद मोहीम राबविण्यात येत आहे. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातही ही मोहीम सुरू असून, महिलांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येत असल्याचे खान यांनी सांगितले.
विहिरींचे पुनर्भरण, नवीन पाणीस्रोत, ग्रामस्तरीय पाणी व्यवस्थापन समित्यांमध्ये महिलांचा सहभाग, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विधवांना आर्थिक मदत, निराधार महिलांचे निवृत्तिवेतन वाढविणे, बचत गटांना अनुदान व कर्जसवलत, रोजगार हमीवर समान वेतन आणि मूलभूत सुविधा, गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण-आरोग्य सुविधा, महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता, स्थलांतरित मजुरांच्या मुलांचे शिक्षण आणि संकटग्रस्त महिलांसाठी गावपातळीवर मदत कक्ष, अशा मागण्या करण्यात आल्या. दुष्काळ निवारणासाठी महिलांच्या गरजांना स्वतंत्र आर्थिक तरतूद करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चित्तथरारक हवाई कसरतींनी साताऱ्याच्या आकाशात 'सूर्यकिरण'चा थरार; सूर्यकिरण टीम दाखल, आगामी एअर शोबाबत उत्सुकता शिगेला
पुढील बातमी
कांदाटी खोऱ्यातील खरोशीत २०० एकरचा भूखंड घोटाळा; पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा नवा लँड बॉम्ब

संबंधित बातम्या