साताऱ्यातही रिक्षाचालकांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा :  सातारा जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांच्या प्रश्नांवर तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या विरोधात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले. रॅपिडो, उबरसारख्या ॲपआधारित बाईक टॅक्सी सेवांमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही सोमवारी (दि. २३) रिक्षा व्यावसायिकांनी आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
सोमवारी सकाळपासून रिक्षा बंद आंदोलनामुळे शहरातील दैनंदिन प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विशेषत: नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करणे, संबंधित धोरण रद्द करणे, विनापरवाना प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणे, रिक्षांसाठी एटीएस (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन) यंत्रणेद्वारे होणाऱ्या पासिंगमधून सूट देणे, ई-रिक्षांसाठी परवाना बंधनकारक करणे तसेच रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, ॲपआधारित बाईक टॅक्सी सेवांमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे इंधन दरवाढ, वाहन देखभाल खर्च आणि विविध प्रशासकीय नियमांचा आर्थिक भार सहन करावा लागत असताना दुसरीकडे बाईक टॅक्सी सेवांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची भावना रिक्षाचालकांमध्ये आहे.
राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन शासनाने या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही रिक्षा संघटनांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरमध्ये निकृष्ट कामाचा नमुना, चार महिन्यांतच खचला काँक्रिट रस्ता; शिंदे गटाचे विभागप्रमुख हेमंत साळवी यांनी उठवला आवाज
पुढील बातमी
स्व. शिवराम माने यांच्या पुण्यस्मरणार्थ जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन; दोन टन अन्नधान्याचे गरजू शाळा व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार

संबंधित बातम्या