राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची समिती महाराष्ट्र दौऱ्यावर; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाची होणार गुणवत्ता तपासणी

by Team Satara Today | published on : 23 November 2026


बामणोली : पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) विशेष समिती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. व्याघ्र संरक्षण, वन्यजीव संवर्धन, वन्यप्राण्यांचा अधिवास, मनुष्यबळ, आर्थिक नियोजन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या मूल्यमापनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची सद्यस्थिती आणि गेल्या चार वर्षांतील कामगिरी स्पष्ट होणार आहे.
देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाची गुणवत्ता तपासण्यासाठी दर चार वर्षांनी व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन (एमईई) केले जाते. यंदा महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांच्या तपासणीसाठी चार विशेष समित्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये सह्याद्री, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर आणि मेळघाट या प्रकल्पांचा समावेश आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने हे मूल्यमापन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. २०२२ मध्ये झालेल्या मूल्यमापनात सह्याद्रीने ७८.७९ टक्के गुण मिळवत 'अतिशय उत्तम' श्रेणीसह राज्यात पाचवा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे यंदा या कामगिरीत किती सुधारणा होते आणि सह्याद्रीच्या व्यवस्थापनाला कोणती गुणवत्ता श्रेणी मिळते, याकडे वनविभागासह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या पाहणीदरम्यान व्याघ्र प्रकल्पाचे नियोजन, वन्यजीवांच्या अधिवासाची स्थिती, गस्त व संरक्षण व्यवस्था, उपलब्ध मनुष्यबळ, आर्थिक साधनसामग्री आणि संवर्धनाच्या कामांचे प्रत्यक्ष परिणाम तपासले जाणार आहेत. मूल्यमापनानंतर प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाला गुणांकन देऊन उत्कृष्ट, अतिशय उत्तम, चांगले आणि समाधानकारक अशा श्रेणी निश्चित केल्या जाणार आहेत.
सह्याद्री पहिल्या तीनमध्ये झेप घेणार?
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन वर्षांत वन्यजीव संवर्धन, व्याघ्र संरक्षण आणि अधिवास व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध सकारात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. वाघांच्या संख्येत झालेली वाढ, प्रभावी पर्यटन व्यवस्थापन, कोअर क्षेत्रातील नागरिकांचे यशस्वी पुनर्वसन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे प्रकल्पाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राज्यातील पहिल्या तीन प्रकल्पांमध्ये स्थान मिळवणार का, याबाबत वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
जागतिक व्याघ्र दिनी अहवाल जाहीर..
राज्यातील सहाही व्याघ्र प्रकल्पांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर समिती आपला सविस्तर अहवाल एनटीसीएकडे सादर करणार आहे. त्यानंतर २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन गुणवत्तेचा अहवाल जाहीर केला जाणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भोळेवाडीच्या ऊस शिवारात आढळली बिबट्याची तीन पिल्ले; पिल्लांना त्यांच्या आईशी पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू
पुढील बातमी
कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती; २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सहा दिवस प्रदर्शन

संबंधित बातम्या