सातारा : करिअर अकॅडमी चालकाकडून विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित संशयिताने सोशल मीडियावर बदनामीकारक कमेंट केल्याचा आरोप पीडित २२ वर्षीय तरुणीने केला आहे. याप्रकरणी तिने पुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडेही दाद मागितली आहे.
सातारा शहरातील एका करिअर अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास अकॅडमी चालक सुनील बबन गाढवे (रा. पालवी चौक, गोडोली) याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यापूर्वीच संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संशयिताने त्या बातम्यांच्या खाली पीडितेची बदनामी होईल अशा आशयाच्या कमेंट केल्याचा आरोप तरुणीने नव्या तक्रारीत केला आहे.
संशयिताकडून आपल्या जीविताला धोका असल्याची भीतीही तिने व्यक्त केली आहे. संबंधिताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तिने पोलिसांकडे केली आहे. या नव्या तक्रारीमुळे विनयभंग प्रकरणाला आता सोशल मीडियावरील कथित बदनामीचे नवे वळण मिळाले आहे.
विनयभंगानंतर पीडित तरुणीची सोशल मीडियावर बदनामी? संशयित अकॅडमी चालकाविरोधात पुन्हा तक्रार, कठोर कारवाई करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 22 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा