महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेच्या चौथ्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटन आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पाणीपट्टी वाढविणे, वेण्णा लेकवर आधुनिक टोल बूथ व फास्टॅग यंत्रणा उभारणे आणि पालिकेचे पंपिंग स्टेशन पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षांसाठी १२ लाख रुपयांचे नवीन वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली. मात्र, बहुचर्चित ई-बोट प्रकल्पाचा निर्णय पुढील सभेपर्यंत लांबणीवर पडला.
सभेच्या सुरुवातीलाच स्वच्छतेच्या ठेक्यावरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय का झाला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विम्याचे हप्ते कंपनीकडे जमा न झाल्याचा मुद्दाही गाजला. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत स्व. बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती सभेत देण्यात आली. अंबिका व नामदेव सोसायटीतील रस्ते व गटारकामे, जिजामाता सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन ड्रेनेज लाईन, पे अँड पार्क, भूमिगत विद्युत वाहिन्या तसेच विविध नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. सभेला उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक ॲड. संजय जंगम, संतोष शिंदे, रोहित ढेबे, कुमार शिंदे, विमल बिरामणे, मिलिंद ढेबे, राजूभाई नालबंद, रवींद्र कुंभारदरे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
चार ते ४६ रुपयांपर्यंत वाढ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी खरेदीचा वाढलेला खर्च आणि पालिकेला सहन करावा लागणारा आर्थिक तोटा लक्षात घेता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार घरगुती पाणीपट्टी प्रतिहजार लिटर १२ रुपयांवरून १६ रुपये, बिगरघरगुती दर ६० वरून १०६ रुपये, तर संस्थांसाठीचा दर ४४ वरून ६५ रुपये करण्यात आला.
ई-बोट प्रकल्पावर चर्चा
वेण्णा लेकवरील ग्रीन ई-बोट प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत विरोधकांनी आक्षेप घेतला. अखेर या प्रस्तावाचा पुनर्विचार करून पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरले. दुसरीकडे, वेण्णा लेकवरील पालिकेचे पंपिंग स्टेशन पुन्हा सुरू करण्यास आणि आधुनिक टोल बूथसह फास्टॅग यंत्रणा उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
महाबळेश्वरमध्ये पाणीपट्टीत वाढ, वेण्णा लेकवरील 'ई-बोट'चा निर्णय पुढे ढकलला; सभेच्या सुरुवातीलाच स्वच्छतेच्या ठेक्यावरून विरोधक आक्रमक
by Team Satara Today | published on : 22 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा