वडापावच्या गाडीला धक्का लागल्याच्या वादातून ढकलल्याने डोके पायरीवर आदळून एकाचा मृत्यू; कोरेगाव येथील घटना

by Team Satara Today | published on : 22 November 2026


कोरेगाव : चक्कर येत असताना वडापावच्या गाडीला धक्का लागून कढईतील तेल सांडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ३८ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून ढकलण्यात आले. यावेळी डोके पायरीवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. किशोर मधुकर जाधव (वय ३८, रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दिलावर सुलेमान शेख (रा. कोरेगाव) याच्याविरोधात शनिवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रणजित महादेव झांजुर्णे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोरेगाव येथील जुना मोटार स्टँडसमोरील दौलत संकुल परिसरात न्यू सुपनेकर वडापाव सेंटरसमोर ही घटना घडली. किशोर जाधव यांना चक्कर येत असल्याने त्यांचा वडापावच्या गाडीला धक्का लागला. त्यामुळे गाडीवरील कढईतील तेल सांडले. याच कारणावरून दिलावर शेख याने किशोर जाधव यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. किशोर यांना चक्कर येत असल्याची माहिती असतानाही शेख याने त्यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ढकलून दिले.
शेख याने दोन वेळा ढकलल्याने किशोर यांचे डोके तेथील पायरीवर दोन वेळा आदळले. या प्रकारात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. डोके पायरीवर आदळल्याने मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही शेख याने हे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस पाटलांच्या पत्नीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ; कराड तालुक्यातील झुंजारवाडी येथील घटना
पुढील बातमी
महाबळेश्वरमध्ये पाणीपट्टीत वाढ, वेण्णा लेकवरील 'ई-बोट'चा निर्णय पुढे ढकलला; सभेच्या सुरुवातीलाच स्वच्छतेच्या ठेक्यावरून विरोधक आक्रमक

संबंधित बातम्या