सातारा : मतदारयादी सखोल पुनर्निरीक्षणाची (एसआयआर) वाढलेली मुदत आणि जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये जाहीर झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार नसल्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता कमी आहे. २०२४ ते २६ या कालावधीत मुदत संपलेल्या सुमारे ८७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका आता थेट पुढील वर्षी होणार असल्याने इच्छुकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. मुदतवाढ मिळाल्यानंतर आता अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
मात्र तीव्र दुष्काळाचा विचार करून या निवडणुका आणखी पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. निवडणुकीचे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत त्यामुळे या निवडणुका सन २०२७ मध्ये होऊ शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणानंतर निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील १२८, कोरेगाव ५६, खटाव ९०, माण ६१, फलटण ८०, खंडाळा ५७, वाई ७६, महाबळेश्वर ४०, जावली ७२, कराड १०४, पाटण १०७ अशा मिळून जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे.
मतदारयादी पुनर्निरीक्षणाची वाढलेली मुदत, दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे
by Team Satara Today | published on : 22 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा