सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसला असला, तरी या निवडणुकीने महायुतीतील राजकीय वर्चस्वाची लढाई मात्र नव्याने चर्चेत आणली आहे. विजयाचे श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट निवडणुकीच्या आकडेवारीचा आधार घेत उत्तर दिले. राजकीय ताकद भाषणातून सिद्ध होत नसते, ती प्रत्यक्ष मतदानातून दिसते, असा स्पष्ट संदेश त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पालकमंत्री भवनात टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य केले. 'दम होता तर निवडणूक लढवायची,' या गोरेंच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी दम किंवा ताकदीची भाषा करण्यापेक्षा निकालाचे आकडे पाहण्याचा सल्ला दिला. आम्ही कधीही दमाची भाषा केलेली नाही. मात्र, कोणाची ताकद किती आहे, हे निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. यावर कोणाला शंका असेल तर आकडेवारीसह जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.
तालुका गटातील ११ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने सात जागा जिंकल्या. जिल्हा गटातील पाच जागांवरही याच ठरावधारकांचे मतदान निर्णायक ठरणार असल्याचे सांगत देसाई यांनी आपल्या राजकीय भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निकालाचे राजकीय अर्थ लावताना केवळ विजयाची घोषणा नव्हे, तर मतांचे गणितही विचारात घ्यावे, असा त्यांचा रोख होता.
गोरेंनी केलेल्या 'जालीम औषधाच्या' वक्तव्यावरही देसाईंनी मिश्कील शैलीत प्रत्युत्तर दिले. 'हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मीही त्यांच्याकडून माहिती घेईन,' अशी टिप्पणी करत त्यांनी टोलेबाजीची संधी साधली.
दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे निवडून आल्याचा आनंद सर्व घटक पक्षांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील सहकारी असल्याने स्वबळावर निवडणूक झाली असती तर काय चित्र दिसले असते, यावर भाष्य करणे त्यांनी टाळले.
एकीकडे महायुतीच्या विजयाचा दावा आणि दुसरीकडे त्याच महायुतीतील नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष, असे विरोधाभासी चित्र सध्या जिल्ह्याच्या राजकारणात दिसत आहे. जिल्हा बँकेतील सत्तेचा तिढा सुटला असला, तरी राजकीय वर्चस्वाचा हिशेब अद्याप बाकी असल्याचे देसाई यांच्या वक्तव्याने अधोरेखित झाले आहे.
जिल्हा बँकेच्या निकालाने राजकीय वजन स्पष्ट; पालकमंत्री देसाईंचा गोरेंना आकडेवारीचा आरसा
शाब्दिक शक्तिप्रदर्शनापेक्षा मतांचे गणित महत्त्वाचे; जाहीर चर्चेचे आव्हान देत महायुतीतील अंतर्गत संघर्षावर टाकला प्रकाश
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा