अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुच्छ लेखू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने कामे करून घ्यावी लागतील - शेखर गोरे, काम करणाऱ्यालाच शिवसेनेत संधी

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : राज्यात महायुतीचे सरकार असून शिवसेना हा सत्तेतील घटक पक्ष आहे. तरीही शासकीय कार्यालयांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुच्छ लेखू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने कामे करून घ्यावी लागतील, असा इशारा शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी दिला.
शिवसेना संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत गोरे यांनी पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी गोरे म्हणाले, पक्ष संघटनेसाठी केवळ पदे घेऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष काम करावे लागेल. प्रत्येक पदाधिकाऱ्याला महिनाभराची मुदत देण्यात येत असून पुढील बैठकीत कामाचा अहवाल सादर करावा. काम न करणाऱ्यांनी स्वतःहून पद बाजूला करावे, अन्यथा त्यांच्या जागी सक्रिय शिवसैनिकांना संधी दिली जाईल.  पक्षवाढीसाठी तन-मन-धनाने काम करणाऱ्याला सर्वतोपरी ताकद देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. तसेच पक्षाच्या पदाचा गैरवापर किंवा गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रंजीत भोसले, रेश्मा जगताप, निलेश मोरे, दीपक चव्हाण, मेघा चोरगे, प्रिया नलवडे, श्वेता वाघमारे, विद्या बर्गे, सुलोचना पवार, अजित सपकाळ, विशाल सपकाळ, गणेश उत्तेकर, समीर गोळे, भूषण शिंदे, गणेश पवार आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२६ नोव्हेंबरला साताऱ्यात रक्तदानाचा जागर; पोलिसांकडून आठ केंद्रांवर रक्तदानाचा उपक्रम, नागरिकांना सहभागाचे आवाहन
पुढील बातमी
जिल्हा बँकेच्या निकालाने राजकीय वजन स्पष्ट; पालकमंत्री देसाईंचा गोरेंना आकडेवारीचा आरसा

संबंधित बातम्या