जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ९ शिक्षकांचे निलंबन; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा दणका, शिक्षकांमध्ये खळबळ

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दणका दिला असून दिव्यांग प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे न दिल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १३ शिक्षकांना सेवेतून का काढण्यात येवू नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तीन वेळा नोटीस दिल्या होत्या. तसेच वारंवांर सूचना देवूनही हे शिक्षक प्रशासनाचे ऐकत नव्हते. दिव्यांग प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रे मागूनसुध्दा संबंधित शिक्षकांनी कागदपत्रे दिली नाहीत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे राजेश जाधव, विजया जगदाळे, सुनिता मम्हाणे, दिपाली खानविलकर, शुभांगी रणवरे, संतोष यादव, सुनिता गावडे, कविता शिंदे व संजीवन जगदाळे या शिक्षकांना निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
दरम्यान, छाया भोसले, भगवान काटकर, यशवंत कांबळे, निता वाघमारे, उदय भंडारे, मनिषा क्षीरसागर, संतोष कदम, सचिन निकाळजे, पूनम गायकवाड, विजय तुपे, बापूराव सोनवलकर, दिगंबर गायकवाड, बाबूसाहेब केदारी या शिक्षकांना ० ते १० टक्के दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते त्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे आरोग्य उपसंचालकांकडे पुन्हा प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्येही त्यांना अपात्र करण्यात आले. त्यानंतर संबंधित शिक्षकांनी न्यायालयातही धाव घेतली होती.याबाबत या १३ शिक्षकांना सेवेतून का काढण्यात येवू नये याबाबतची नोटीस जिल्हा परिषद प्रशासनामार्फत बजावण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घोणसला जीवदान देताना कोरेगावच्या सर्पमित्राचा मृत्यू; दुर्दैवी घटनेने कोरेगाव शहर व परिसरात शोककळा
पुढील बातमी
भुईंज कारखाना-भुईंज रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार; ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार

संबंधित बातम्या