सातारा : भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण ॲरोबॅटिक टीमच्यावतीने सैनिक स्कूल सातारा येथे विशेष हवाई प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकांच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या उड्डाणाची सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सैनिक स्कूल सातारा केंद्र मानून ३० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात दोन दिवस ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
भारतीय हवाई दलाच्या नऊ विमानांचा समावेश असलेल्या सूर्य किरण ॲरोबॅटिक टीमचे हवाई प्रात्यक्षिक सैनिक स्कूल सातारा येथे होणार आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत सराव प्रात्यक्षिक, तर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुख्य हवाई प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या हवाई कवायती अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक स्वरूपाच्या असून, विमाने जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून उड्डाण करणार आहेत. त्यामुळे परिसरात उडणाऱ्या अनधिकृत ड्रोन, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स किंवा अन्य कमी उंचीवरून उडणाऱ्या वस्तूंमुळे विमानांच्या सुरक्षिततेला तसेच प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०२६ राेजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व २६ नोव्हेंबर २०२६ राेजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सैनिक स्कूल सातारा केंद्र मानून ३० किलोमीटर त्रिज्येतील संपूर्ण हवाई क्षेत्र 'रेड झोन' अर्थात नो-ड्रोन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही व्यक्ती, संस्था, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर किंवा खासगी व व्यावसायिक ड्रोन चालकांना ड्रोन, मानवरहित हवाई वाहने, पॅरामोटर्स, पॅराग्लायडर्स, हँग ग्लायडर्स, मायक्रोलाइट विमाने, हॉट एअर बलून तसेच अन्य कमी उंचीवरून उडणाऱ्या वस्तू उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, भारतीय हवाई दल आणि पोलीस विभागाच्या अधिकृत कामकाजाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रचलित ड्रोन नियम व अन्य संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच उल्लंघन करणाऱ्यांचे ड्रोन व संबंधित साहित्य तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. हवाई प्रात्यक्षिकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडू नये, यासाठी नागरिकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे आणि प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन किंवा अन्य उडणारी उपकरणे वापरू नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सैनिक स्कूल सातारा परिसरात ३० किलोमीटर क्षेत्रात ड्रोन उडविण्यास बंदी; जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा मनाई आदेश
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा