पदवीधर, पदविकाधारक तरुणांनी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देऊन त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS) राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापना, उद्योग आणि रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व्यावहारिक अनुभव मिळण्यासह कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढविण्यास मदत होते.
जिल्ह्यातील विविध आस्थापना, उद्योग, रुग्णालये आणि उद्योजकांनी NATS अंतर्गत शिकाऊ उमेदवार नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती द्यावी. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षणाचे ट्रेड किंवा शाखा यांचा आढावा घेऊन पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग  यांनी समन्वयाने मागील पाच वर्षांत उत्तीर्ण झालेल्या पदवीधर व पदविकाधारक उमेदवारांची माहिती संकलित करावी. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील पात्र तरुणांचा विशेषत्वाने समावेश करावा. संकलित माहितीच्या आधारे उमेदवारांना योजनेची माहिती, नोंदणी प्रक्रिया आणि उपलब्ध प्रशिक्षण संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.
योजनेची अधिक माहिती, नोंदणी व प्रशिक्षण संधींबाबत मार्गदर्शनासाठी जिल्हा संपर्क अधिकारी वैभव चोरगे (NATS Liaison Officer, BOAT WR, Satara) यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क : वैभव चोरगे, मोबाईल : +91 79725 00435
ई-मेल : vaibhave.boatwn@gmail.com
जिल्ह्यातील पात्र तरुणांनी तसेच शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी या योजनेत सहभागी होऊन प्रशिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण- २०२६ सुधारित वेळापत्रक जाहीर
पुढील बातमी
माजी सैनिक व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

संबंधित बातम्या