साताऱ्याच्या विकासासाठी शिवेंद्रसिंहराजेंची मोठी कामगिरी! आठ दिवसांत २०९.९१ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

नगरपालिकेतर्फे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान; शहराच्या पायाभूत सुविधांना मिळणार नवे बळ

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : सातारा शहराच्या रखडलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत २०९.९१ कोटी रुपयांचा निधी विविध कामांसाठी उपलब्ध झाल्याने शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. या निधीमुळे साताऱ्याच्या रस्त्यांपासून सांस्कृतिक सुविधांपर्यंत अनेक प्रकल्पांना चालना मिळणार आहे. या कामांतील योगदानाबद्दल सातारा नगरपालिकेच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, नगरसेवक अक्षय जाधव, सुशांत महाजन,  विजय देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
नगरपालिकेसाठी १२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले. मेडा स्मशानभूमीच्या विकासासाठी दोन कोटी रुपये, राजपथ व राधिका रोडच्या काँक्रिटीकरणासाठी तसेच शाहू कला मंदिराच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना केवळ वरवरचे काम न करता भविष्यातील गरजांचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी राजपथ आणि राधिका रोड पूर्णपणे खोदून अंतर्गत जलवाहिन्या, पाइपलाइन आणि अन्य कनेक्शनची तपासणी केली जाईल. आवश्यक दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतरच काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
विकासकामांच्या अंमलबजावणीदरम्यान वाहतूक, व्यापार आणि दैनंदिन व्यवहारांवर काही काळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तात्पुरती गैरसोय सहन करून विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजित पवार अपघाताच्या सत्यशोधनासाठी रोहित पवारांच्या लढ्याला बळ; पद्मश्री लक्ष्मण माने मैदानात
पुढील बातमी
दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा; जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक यांची पत्रकाद्वारे माहिती

संबंधित बातम्या