सातारा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा आणि सांगली जिल्ह्याने गाजविलेल्या क्रांतिकारी इतिहासाची शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकारच्या ऐतिहासिक संघर्षावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ हा मराठी चित्रपट शुक्रवारपासून (दि. २०) राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भागीरथी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान, त्यांचा त्याग आणि ब्रिटिश सत्तेविरोधातील लढा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष अनसुरकर यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील भूमिका आणि संकल्पना स्पष्ट केली. सातारा-सांगलीच्या मातीत घडलेल्या प्रतिसरकारच्या इतिहासाला व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटना आणि क्रांतिकारकांचे कार्य नव्या पिढीला समजावे, हा चित्रपट निर्मितीमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि संगीताची जबाबदारी मनिष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. अनिल राबाडे, अनुराधा धामणे, सिद्धार्थ बदी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धार्थ बदी यांनी क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता अंकित मोहन अतिथी कलाकार म्हणून दिसणार असून उपेंद्र लिमये यांचा भारदस्त आवाज चित्रपटाच्या व्हॉईस ओव्हरसाठी लाभला आहे.
ऐतिहासिक घटनांचा संदर्भ, क्रांतिकारकांचे धाडस आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाची ओळख महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांना करून देण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः नव्या पिढीला प्रतिसरकारच्या इतिहासाची ओळख करून देणारा हा चित्रपट ठरेल, असा विश्वास दिग्दर्शक मनिष अनसुरकर यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यलढ्यातील साताऱ्याच्या क्रांतीचा इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपट प्रदर्शित
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या संघर्षाची ऐतिहासिक गाथा उलगडणार
by Team Satara Today | published on : 20 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा