सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला असला, तरी प्रत्यक्ष सत्तावाटपाच्या वेळी घटक पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत. निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांच्या भूमिकेला अनुकूल निर्णय घेतले. मात्र, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी अपेक्षित समन्वय साधला गेला नाही. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांची माहिती देऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने स्वतंत्र निर्णय घेतल्याचे सांगत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.
'सुरूचि' निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणित स्पष्ट केले. निवडणुकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. जागावाटपाचा बहुतांश निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा; मात्र एखाद्या ठिकाणी मतभेद झाल्यास वरिष्ठांकडे विषय न्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती.
पदाधिकारी निवडीबाबतही स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अडचणी वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. चेअरमनपदासाठीचे नाव मंत्री मकरंद पाटील यांना सांगण्यात आले होते. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाईही उपस्थित होते. व्हाईस चेअरमनपदाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची चर्चा झाली होती, असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
महायुतीच्या निर्णयामुळे भाजपला निवडणुकीत काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. स्वतःकडे मतदानाची ताकद असूनही पक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला प्राधान्य दिले. त्यामुळे भाजपमधील इच्छुक आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठांची भूमिका काय आहे, यावर भाष्य करण्यास शिवेंद्रराजे यांनी नकार दिला. मात्र, पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेतील सत्तावाटपानंतर महायुतीमधील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
जिल्हा बँकेच्या राजकारणात भाजपची वेगळी चूल; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडले मनातील शल्य
महायुतीच्या निर्णयासाठी भाजपने घेतली माघार; पदाधिकारी निवडीत मित्रपक्षांनी स्वतंत्र भूमिका स्वीकारल्याने राजकीय पेच
by Team Satara Today | published on : 20 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा