सातारा : सातारा-मेढा रस्त्यावर कोंडवे (ता. सातारा) हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या स्पोर्ट बाईकने दिलेल्या जोरदार धडकेत ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोनाली श्रीकांत बोडके (वय ३५, रा. कोंडवे, ता. सातारा) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या दुचाकीस्वार युवकाला सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोंडवे येथील विघ्नहर्ता कॉलनीजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृत सोनाली बोडके या आपल्या नणंद कल्याणी शंकर गोगावले यांच्यासमवेत रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. याच वेळी साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्पोर्ट बाईकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दुचाकी थेट सोनाली बोडके यांच्या अंगावर पडली. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने माणुसकी न दाखवता आपली दुचाकी उचलली आणि कोणालाही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातात सोनाली बोडके यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्या, तर त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या कल्याणी गोगावले यादेखील किरकोळ जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच बोडके कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सोनाली यांना खासगी वाहनातून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अपघातास कारणीभूत ठरलेली दुचाकी हामदाबाज (ता. सातारा) येथील सुदान सोनवले (वय २२) हा युवक चालवत असल्याचे निष्पन्न झाले. तो साताऱ्याहून आपल्या हिमालयन स्पोर्ट बाईकवरून आपल्या गावी जात असताना हा अपघात घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सातारा-मेढा रस्त्यावर भरधाव स्पोर्ट बाईकच्या धडकेत कोंडवेतील महिलेचा मृत्यू; अपघातानंतर पसार झालेल्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
by Team Satara Today | published on : 20 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा