सातारा : खोट्या कागदपत्रांच्या आधारे इतर मागासवर्ग (कुणबी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या खटाव तालुक्यातील 'निमसोड' जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य संदिप नारायण मांडवे यांना सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दणका दिला आहे. तक्रारदार नानासाहेब उर्फ नंदकुमार महादेव मोरे आणि ओमकार तानाजी भोसले यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, समितीने मांडवे यांचा कुणबी जातीचा दावा अमान्य करत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून कायमस्वरूपी रद्द केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदिप नारायण मांडवे यांनी माण-खटाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले होते. या प्रमाणपत्राविरोधात मोरे आणि भोसले यांनी समितीकडे रीतसर तक्रार दाखल करून लेखी युक्तिवाद सादर केला होता. पडताळणी दरम्यान अर्जदाराला आपल्या जाती दाव्याच्या खरेपणाबाबत कोणतेही ठोस व सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. महाराष्ट्र अधिनियम २००० मधील कलम ८ नुसार जात सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराची असते, मात्र त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समितीच्या निदर्शनास आले.
या प्रकरणावर भाष्य करताना समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या ‘महाराष्ट्र शासन विरुद्ध मिलिंद आणि इतर’ या ऐतिहासिक निकालाचा आधार घेतला. पात्र नसलेल्या व्यक्तीने खोटे प्रमाणपत्र मिळवणे हे घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आणि खऱ्या मागासवर्गीय व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणारे घटनाविरोधी कृत्य असल्याचे ताशेरे समितीने ओढले आहेत. संदीप मांडवे हे खोटे असल्याचे स्पष्ट करत समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध घोषित केले आहे.
समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, सदस्य उमेश घुले आणि सदस्य सचिव सुनिल जाधव यांच्या स्वाक्षरीने हा अंतिम निकाल देण्यात आला असून, माण-खटावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र तात्काळ जप्त करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे बोगस दाखले मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी मांडवे यांना ९० दिवसांच्या आत पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमुळे मांडवे यांच्या जिल्हा परिषदेत सदस्यत्वाची टांगती तलवार झाली आहे, एवढे मात्र नक्की.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेला संदीप मांडवे यांचा ‘कुणबी’ जातीचा दाखला अखेर रद्द; सातारा जात पडताळणी समितीचा दणका
तक्रारदारांच्या लढ्याला मोठे यश; ‘खोटा दावेदार’ ठरवत मांडवे यांचे प्रमाणपत्र जप्त करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश
by Team Satara Today | published on : 20 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा